पालिकेला ‘कंन्स्ट्रक्शन टाईम्स ॲवॉर्ड 2023' राष्ट्रीय पुरस्कार
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 02, 2023
- 519
नवी मुंबई ः सुनियोजित बांधणीचे आधुनिक शहर म्हणून नावाजल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहराने गुणात्मक नागरी सुविधा व अत्याधुनिक प्रकल्पांमुळेही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. नागरी विकासातील या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेस नुकताच ‘कंन्स्ट्रक्शन टाईम्स ॲवॉर्ड 2023' हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून ग्रेटर नोएडा येथील विशेष समारंभात सन्मानित करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान स्विकारला.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सायन्स पार्क, सेंट्रल लायब्ररी, एनएमएमटी उपक्रमाची वाशी येथील बहुउपयोगी आकर्षक इमारत यासारखे नाविन्यपूर्ण प्रकल्प उभारले जात असून यापूर्वीच्या लौकीकात लक्षणीय भर टाकली जात आहे. उद्यानांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरात वंडर्स पार्क, पंचतत्वावर आधारित सेंट्रल पार्क, झेन गार्डन, संवेदना उद्यान, निसर्ग उद्यान, रॉक गार्डन अशा विविध संकल्पनांवर आधारित थीम पार्क विकसित करण्यात आलेली आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेची मुख्यालय वास्तू ही देशातील वास्तुरचनेचा एक आदर्शवत नमूना मानला जात असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची रचना व त्याचा डोम वास्तुकलेचा वैशिष्ट्यपूर्ण नमूना म्हणून ओळखला जातो. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोणताही प्रकल्प, वास्तू उभारताना त्यामध्ये कामाच्या गुणवत्तेसोबतच त्याची वास्तुरचनाही वैशिष्ट्यपूर्ण ठेवण्याकडे विशेष लक्ष दिले जाते. त्याचप्रमाणे कोणतीही नागरी सुविधा दर्जेदार आणि लोकोपयोगी असण्यावर भर दिला जातो. अशा विविध बाबींचा विचार कंन्स्ट्रक्शन टाईम्स ॲवॉर्डच्या त्रयस्थ परीक्षण समितीने बारकाईने केलेला असून बांधकाम आणि पायाभूत सुविधा प्रकल्प क्षेत्रातील अभिनव व सर्वोत्तम कामगिरीबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेची निवड नगरविकास क्षेत्रातील सर्वोत्तम महानगरपालिका म्हणून ‘कंन्स्ट्रक्शन टाईम्स ॲवॉर्ड 2023' करिता केलेली आहे.
एआरके इव्हेन्ट्स ॲण्ड मिडीया प्रा.लि. संचालित कंन्स्ट्रक्शन टाईम्स या मासिकात नगरविकास क्षेत्राशी संबंधीत उल्लेखनीय काम करणा-या व्यक्ती / संस्था / समूह यांची नोंद घेत त्यांच्या उल्लेखनीय कामांची माहिती प्रसिध्द करून लोकांमध्ये प्रसारित केली जात असून ‘कॉनएक्स्पो इंडिया 2023' सारखा भव्यतम उपक्रम राबवून त्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्ती / संस्था यांना गौरविण्यात येते. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या उल्लेखनीय पायाभूत नागरी सुविधा कामांचा व बांधकामे आणि वास्तूंचा विचार करून कंन्स्ट्रक्शन टाईम्स ॲवॉर्ड 2023 प्रदान करून गौरविण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai