शौचालयात थाटला बार
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 22, 2023
- 398
नवी मुंबई ः स्मार्ट सिटीकडे वाटचाल होत असलेले नवी मुंबई शहर इतर शहरांसाठी आदर्श ठरत असतानाच येथील स्थानिक प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे काही समाजकंठकाकडून येथील सार्वजनिक मालमत्तेवर कब्जा करुन खुलेआम व्यवसाय थाटण्यात येत असल्याचे समोर आले आहे. तुर्भे विभागात सार्वजनिक शौचालयाचे बारमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. मनसेचे उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे यांनी या बारचा पर्दाफाश करुन सिडकोकडे याची तक्रार केली आहे.
काही दिवसांपुर्वी मानसरोवर रेल्वे स्थानकातील शौचालयामध्ये संसार थाटल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता तुर्भेतील सार्वजनिक शौचालयात बार सुरु करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एपीएमसी ट्रक टर्मिनल जवळ येणाऱ्या नागरिकांसाठी हे शौचालय बांधण्यात आले होते. मात्र बार व्यावसायिकाने या शौचालयाच्या आतमध्ये थेट बारची निर्मिती केली आहे. तुर्भेच्या सेक्टर 19 मध्ये सैराट बार सुरु असल्याचा पर्दाफाश मनसेचे उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे यांनी केला. शौचालयाचे बारमध्ये रुंपातर करण्यात आल्याचे समजताच त्यांनी वॉर्ड अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करुन याची माहिती काढली. तसेच मनपा अधिकाऱ्यांना या बारमध्ये आणून सदर प्रकार दाखवून देण्यात आला. मात्र मनपाने हे शौचालय सिडकोचे असल्याचे सांगत त्यांच्याकडे बोट दाखविले. तसेच मनपाने सिडकोला अतिक्रमणाबाबतचे एक पत्रही दिले. मनसेच्या माध्यमातून आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहोत, अशी प्रतिक्रिया पार्टे यांनी दिली. या शौचालयाला सैराट बार बनविणाऱ्यांना समोर आणल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
नवी मुंबई शहर इतर शहरांसाठी आदर्श ठरत असतानाच शहरात शौचालयाचे बार होत असतील तर पोलीस प्रशासन आणि संबंधित शासकीय यंत्रणा काय करते? असा प्रश्न सध्या नागरिकांना सतावत आहे. तसेच अधिकाऱ्यांचा आर्शिवाद असल्याशिवाय अशा घटना घडू शकत नाहीत अशीही चर्चा नवी मुंबईत सुरु आहे. प्रत्यक्षात हे सिडकोचे शौचालय असून अद्याप एपीएमसी प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आलेले नाही. यात मनपाच्याच एका अधिकाऱ्याचा हस्तक्षेप असल्याचा आरोप करत यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai