700 कोटींचा दलाल कोणाच्या फायद्यासाठी?
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 10, 2023
- 730
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा विधानसभेत सवाल
मुंबई ः पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी नवी मुंबईत बांधण्यात येत असलेल्या 67 हजार घरांच्या विक्रिसाठी सिडकोने 700 कोटींचा दलाल नेमला आहे. चालु अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा दलाल कोणाच्या फायद्यासाठी नेमला आहे? असा खोचक सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करुन विधानसभेत खळबळ माजवली.
सिडकोने नवी मुंबईतील विविध नोड्समध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी 67 हजार घरे बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. यापुर्वी त्यांनी 14 हजार घरे बांधुन वितरीत केली आहेत. परंतु, यावेळी सिडकोने या घरांच्या विक्रिसाठी दलाल नेमण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी 700 कोटी रुपये सिडको खर्च करणार आहे. याबाबतचे सर्वप्रथम वृत्त आजची नवी मुंबईने प्रसिद्ध केले होते.
राज्याच्या चालु अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या दलालांच्या नियुक्तीबाबत सरकारला जाब विचारला आहे. आतापर्यंत लाखो घरे बांधणी आणि विक्रीचा मोठा अनुभव गाठीशी असताना सिडकोने यावेळी ही घरे विकण्यासाठी दोन खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. ऐरवी सिडकोची घर खरेदीसाठी लोकं मोठया प्रमाणात पुढे येत असताना आता ही घरे विकण्यासाठी सिडकोने खासगी कंपनीची नेमणूक का व कोणाच्या फायद्यासाठी केली आहे, असा सवाल त्यांनी पुरवणी मागण्यांवरील भाषणात उपस्थित केला.
सिडको स्वतः तयार केलेली घर विकण्यासाठी खासगी कंपनीला 699 कोटी रुपये मोजणार आहे. म्हणजे या प्रकल्पातील प्रत्येक विक्री झालेल्या घरावर या कंपन्यांना 1 लाख रुपये कमीशन मिळणार आहे. हे काम थॉटट्रेन डिजाईन प्रायव्हेट लिमिटेड, हेलीअस मीडीयम बाजार प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्याला संयुक्त रितीने दिले आहे. या कंपन्या या प्रकल्पाचे मार्केटींग, ब्रँडीग, सेल्स आणि प्रकल्प अस्तित्वात आल्यानंतर त्याचे मार्केटींग करणार आहे. 24 फेब्रुवारी 2022 ला या संदर्भात या दोन्ही कंपन्यासोबत करार पत्र करण्यात आले आहे. एकूण कंत्राटाच्या रक्कमेच्या 1 टक्का म्हणजे 6 कोटी रुपयाची सुरक्षा ठेव या कंपन्याकडून घेण्यात आली आहे. दानवेंच्या या आरोपांनंतर नगरविकास विकास खडबडून जागा झाला असून या कामाच्या सर्व फायली मंत्रालयात मागवून घेतल्या आहेत असे सुत्रांकडून कळत आहे.
सिडको ही घरे बनवणारी व विकणारी शासकीय संस्था आहे. लाखो घरे बांधुन ती विकण्याचा गाढा अनुभव सिडकोच्या पाठीशी आहे. सिडकोकडे याचा अनुभव असलेला मोठा अधिकारी वर्ग आहे. असे असताना कोणाचेतरी खिसे भरण्यासाठी 700 कोटींचा दलाल नेमणे हे सिडकोचे काम नाही. सिडकोने कोणाच्यातरी इशाऱ्यावरुन हा दलाल नेमला आहे. - अंबादास दानवे, विरोधीपक्ष नेते
- सदर प्रकरणाची चौकशी करा
सिडकोने 67 हजार घरे विकण्यासाठी थॉटट्रेन डिजाईन प्रायव्हेट लिमिटेड, हेलीअस मीडीयम बाजार प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांची नियुक्ती केली आहे. 700 कोटींच्या बदल्यात फक्त 6 कोटींची सुरक्षा अनामत घेण्यात आली आहे. सिडकोने अशाप्रकारच्या संस्थेमार्फत घरांची विक्री केल्यास सिडकोची विश्वासार्हता कमी होईल. शासनाने या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai