फळभाज्यांचे दर घसरले

नवी मुंबई ः गणेशोत्सव संपला असल्याने अनेकांचा मोर्चा मांसाहाराकडे वळला असतानाच भाजीपाल्याच्या मागणीतही घट झाली आहे. त्यामुळे काही ठराविक भाज्या वगळता अन्य भाज्यांचे दर उतरले आहेत. कोबी, फ्लॉवर, पडवळ, शिराळी, वांगी यांसारख्या भाज्या तर आठ ते दहा रुपये किलो दराने घाऊक बाजारात विकल्या जात आहेत. सर्वात जास्त दर टोमॅटोचे घसरले असून टोमॅटो चार ते सहा रुपये किलो दराने विकला जात आहे. मात्र दर इतके खाली येऊनही खरेदीदारांनी बाजाराकडे पाठ फिरविली आहे.

वाशीतील घाऊक भाजीपाला बाजारात बुधवारी 88 ट्रक तर 569 टेम्पो इतक्या गाड्या भाजीपाल्याची आवक झाली. तर, 645 गाड्या भाजीपाला मुंबई आणि उपनगरांत गेला आहे. सध्या फ्लॉवर, टोमॅटो, कोबी, भोपळा, भेंडी या भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. फ्लॉवरच्या 40, कोबीच्या 20 ते 25, वांग्याच्या 20 ते 22 गाड्या नियमित बाजारात येत आहेत. मात्र त्यांना हवी तशी मागणी नाही.

अन्य भाज्यांचे दर नियमित आहेत. मात्र बाजारात खरेदीदार नसल्याने माल पडून राहत आहे. परिणामी, मालाचे भावही पडले आहेत. त्यातच सर्वाधिक दर टोमॅटोचे उतरले आहेत. टोमॅटोच्या निर्यातीवर निर्बंध आल्याने अनेक ठिकाणी टोमॅटो पडून असून तो फेकून देण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. परिणामी, बाजारात गेल्या महिनाभरापासून टोमॅटोचे दर उतरले आहेत. या आठवड्यात घाऊक बाजारात टोमॅटो चार ते सहा रुपये किलोने विकला जात आहे. मात्र असे असूनही टोमॅटोला हवा तसा उठाव नाही. सध्या टोमॅटोच्या साठ ते सत्तर गाड्या बाजारात रोज येत आहेत. मुंबई बाजाराची टोमॅटोची मागणी चाळीस गाड्यांवर आली आहे. त्यामुळे विक्री न झाल्याने येथेही टोमॅटो फेकून दिला जात आहे.

हिरव्या मिरचीचे दरही आता आवाक्यात आले असून चाळीस रुपये किलोपर्यंत गेलेली मिरची 15 ते 16 रुपये किलोवर आली आहे. तर, तोंडली 10 ते 15 रुपये किलो, लाल भोपळा सहा ते आठ रुपये किलोने विकला जात आहे, अशी माहिती बाजार समितीने दिली आहे.