वसूलीत नगररचना विभागाचीही आघाडी
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 06, 2023
- 286
मागील वर्षीपेक्षा 209.18 कोटी अधिक उत्पन्न
नवी मुंबई ः अंदाजपत्रकात दिलेले वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ज्याप्रमाणे नियोजनबध्द रितीने मालमत्ता कर विभागाने सुयोग्य पाऊले उचलत मागील वर्षी पेक्षा 107 कोटी 17 लक्ष अधिकचे विक्रमी उत्पन्न प्राप्त केले. त्याचप्रमाणे नगररचना विभागानेही विविध अडथळ्यांवर मात करीत विकासशुल्कापोटी मागील वर्षीपेक्षा 209.18 कोटी अधिक उत्पन्न मिळवले आहे.
नगररचना विभागास सन 2022-23 या आर्थिक वर्षात 200 कोटी रक्कमेचे सुधारित उद्दिष्ट देण्यात आले होते. त्या अनुषंगाने आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार, सहाय्यक संचालक नगररचना श्री. सोमनाथ केकाण यांच्या नियंत्रणाखाली नगररचना विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न करीत हे उद्दिष्ट गाठलेले आहे. कोरोना प्रभावीत कालखंडात 2020 पासून शहरातील विकास कामांची गती अतिशय मंदावलेली होती. मागील 2 आर्थिक वर्षात नगररचना शुल्कातून अत्यल्प उत्पन्न प्राप्त झाले होते. सन 2020-21 या आर्थिक वर्षात रु. 95 कोटी उद्दिष्टापैकी रु.58.92 कोटी इतकी वसूली झाली होती. त्याचप्रमाणे पुढील 2021-22 या आर्थिक वर्षात रु.100 कोटी उद्दिष्टापैकी रु.57.63 कोटी इतकीच वसूली झाली होती. तथापी यावर्षी कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाल्यानंतर विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी नगररचना विभागामार्फत विशेष प्रयत्न करण्यात आले.
सन 2022-23 या आर्थिक वर्षात शेवटच्या मार्च महिन्यात नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नात लक्षणीय भर पडलेली असून माहे मार्च मध्ये रु.109.65 कोटी इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे. यामध्ये विशेष म्हणजे 31 मार्च या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी एका दिवसात रु.62.66 कोटी इतकी रक्कम विकास शुल्क अधिकमूल्य पोटी वसूल करण्यात आलेली आहे. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा रु.66.81 कोटी अधिक उत्पन्न मिळवित नगररचना विभागाने आत्तापर्यंतचे रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळविलेले आहे. विकास योजनेच्या हरकती व सूचनांच्या सुनावणीचा कार्यक्रम मार्च महिन्यातच नियोजित करूनही नगररचना विभागाने सुट्टी न घेता सुट्टीच्या दिवशीही कार्यालय सुरु ठेवून सदरचे उद्दिष्ट गाठले आहे.
मालमत्ताकर विभागाप्रमाणेच नगररचना विभागाने उद्दिष्टापेक्षा अधिक वसूली करीत 133.40 टक्के वसूली या आर्थिक वर्षात केलेली असून रु.266.81 कोटी इतकी रक्कम विकास शुल्कापोटी वसूल केलेली आहे. ही रक्कम मागील वर्षीपेक्षा रु.209.18 कोटीने अधिक असून नगररचना विभागाने प्राप्त केलेल्या या यशस्वी महसूलाबद्दल महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सहाय्यक संचालक नगररचना सोमनाथ केकाण व त्यांच्या नगररचना विभागातील सहकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगल्या कामाबद्दल प्रशंसा केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai