थकबाकीदारांविरोधात धडक कारवाई सुरू
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 24, 2026
- 27
नवी मुंबई ः महापालिकेच्या कर विभागाने थकबाकीदारांविरोधात तात्काळ कठोर कारवाई करावी व संबंधितांना नोटीस बजावून 31 मार्च 2026 पर्यंत कर न भरल्यास त्यांच्या मालमत्ता नियमानुसार जप्त करून त्यांची लिलाव प्रक्रिया सुरू करावी, असे स्पष्ट निर्देश नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मालमत्ता कर वसुलीचा आढावा घेताना दिले. बिगरनिवासी, औद्योगिक तसेच मोकळ्या जागांच्या मालमत्ता थकबाकीदारांवर प्रामुख्याने जप्तीची व लिलावाची कारवाई करण्यात यावी असे देखील आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. आयुक्त महोदय यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांतील अधिकाऱ्यांची मालमत्ता कर वसूली संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.
नवी मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसूलीस गती देण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, अद्यापही काही मालमत्ताधारकांनी कर भरलेला नसल्याचे निदर्शनास आले असून, अशा थकबाकीदारांविरोधात जप्तीची कारवाई करून त्या मालमत्तेची लिलाव प्रक्रिया करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार विहित मुदतीची नोटीस दिल्यानंतरही 31 मार्च 2026 पर्यंत कर न भरल्यास संबंधित मालमत्तांवर जप्तीची कारवाई करून त्याची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात येईल. महत्वाचे म्हणजे नवी मुंबई महापालिकेकडून मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी 10 मार्च 2026 रोजी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक तसेच मोकळ्या जागांच्या मालमत्ता कराची थकबाकी एकरकमी भरल्यास संबंधित मालमत्ताधारकांना विलंब शुल्कावर 50 टक्के सवलत देण्यात येत आहे. सदर सवलतीचा लाभ घेण्यासाठी आर्थिक वर्ष 2025-2026 पर्यंतची संपूर्ण थकबाकी निर्दिष्ट कालावधीत एकरकमी भरणे आवश्यक असून, या योजनेची मुदत 31 मार्च 2026 रोजी, रात्री 12.00 वाजेपर्यंत आहे. याशिवाय महानगरपालिकेकडून मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी जप्तीची व लिलावाची कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी तात्काळ मालमत्ता कर भरावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
- साडे तीन हजार थकबाकीदारांना नोटीस
वारंवार कसुरदार अशा 3 हजार 642 थकबाकीदारांना महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या वतीने 7 दिवस/48 तासाची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच नोटीस दिल्यानंतर देखील मालमत्ता कर न भरलेल्या मालमत्ता जप्त करून त्या मालमत्तांची लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तरी अद्याप ज्या मालमत्ताधारकांनी कर भरलेला नाही, त्यांनी जप्ती व लिलावाची कठोर कारवाई टाळण्यासाठी मालमत्ता कर भरावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या मालमत्ताकर विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai