शहर सौंदर्यीकरणात नवी मुंबई राज्यात नंबर वन
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 20, 2023
- 518
क वर्ग महानगरपालिकांच्या स्पर्धेत मारली बाजी ; 15 कोटी पारितोषिक
नवी मुंबई ः शासनाच्या वतीने शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा 2022 मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल क वर्ग महानगरपालिकांच्या गटात नवी मुंबई महानगरपालिकेस राज्यात प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. मुंबईतील एनसीपीए सभागृहात नगरविकास दिनाचे औचित्य साधून आयोजित विशेष समारंभात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी हा राज्यस्तरीय मानाचा पुरस्कार स्विकारला.
नवी मुंबई महानगरपालिकेस क वर्ग महानगरपालिकांमध्ये राज्यात प्रथम क्रमांकाचे प्रशस्तीपत्र आणि रु.15 कोटी पारितोषिक रक्कमेचा धनादेश प्रदान करण्यात आला. राज्य शासनामार्फत शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालिकेस मिळालेला हा राज्यात प्रथम क्रमांकाचा बहुमान प्रत्येक कामात उत्साहाने सहभागी होणाऱ्या नवी मुंबईकर नागरिकांच्या सक्रीय सहकार्यामुळे मिळाला असून हा पुरस्कार नवी मुंबईकर नागरिकांना समर्पीत करीत असल्याचे मत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केले. कोणताही पुरस्कार हा चांगले काम केल्याबद्दल प्रोत्साहित करणारा असून त्यासोबतच अधिक चांगले काम करण्याची जबाबदारी वाढविणारा असतो. त्यादृष्टीने यापुढील काळात अधिक जोमाने ‘निश्चय केला, नंबर पहिला' हे ध्येयवाक्य नजरेसमोर ठेवून स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिक, लोकप्रतिनिधी, स्वच्छताकर्मी, अधिकारी कर्मचारीवृंद, प्रसारमाध्यमे असे सारेजण एकत्रित प्रयत्नांतून संपूर्ण क्षमतेने अधिक उत्तम कामगिरी करतील असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.
नवी मुंबईचे स्वरुप इतके आकर्षित करणारे व लक्षवेधी झाले की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुलाखतीत नवी मुंबईच्या शहर सुशोभिकरणाचा कौतुकाने उल्लेख केला. परदेशात गेल्यानंतर तेथील स्वच्छतेप्रमाणेच सुंदरतेनेही आपण प्रभावित होतो. त्या धर्तीवर सुशोभिकरणाच्या नवनव्या संकल्पना जे.जे., रचना संसद अशा कला महाविद्यालयातील विद्यार्थी चित्रकारामार्फत राबविण्यात आल्या. त्यामुळे शहराचे रूपच बदलून गेले.
पालिका क्षेत्रातील उड्डाणपूल, पादचारी पूल, सब वे अत्याधुनिक वॉल मिडिया प्रकारात सजविण्यात आले असून आकर्षक विदयुत रोषणाई करण्यात आलेली आहे. स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट असून त्याला सुशोभिकरणाची जोड मिळाली तर शहर अस्वच्छ करण्याची मानसिकताच निर्माण होणार नाही या भूमिकेतून केवळ काही चौक व मुख्य जागा यापुरतेच मर्यादित न राहता संपूर्ण शहरात सुशोभिकरणाचे व्यापकत्व प्रदर्शित व्हावे यादृष्टीने पालिकेने शहर सुशोभिकरणावर लक्षणीय भर दिला. शहराला विविध कारणांनी भेटी देणाऱ्या प्रवासी नागरिकांकडून या बदललेल्या आकर्षक रुपाची विशेष नोंद घेतली गेली तसेच शहराविषयी नवी मुंबईकर नागरिकांच्या मनात असलेला अभिमान अधिक वृध्दींगत झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. याचेच परिणामस्वरूप म्हणून नगरविकास दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या वतीने शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा 2022 मध्ये क वर्ग महानगरपालिकांच्या गटात नवी मुंबई महानगरपालिकेस राज्यात प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai