नाट्यगृहांच्या कामाचा पडदा कधी उघडणार?

नवी मुंबई ः नवी मुंबईत एकमेव असलेल्या वाशीतील नाट्यगृहाचे सुशोभिकरण लांबणीवर पडत चालले आहे तर प्रस्तावित ऐरोली नाट्यगृहाच्या उभारणीचे काम निविदांचा गर्तेत अडकले आहे. चार वर्षांपासून रखडलेल्या या नाट्यगृहाच्या कामासाठी आता पुन्हा नवी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला असून यासाठी 30 कोटी 67 लाखांची निविदा काढण्यात आली आहे. तर विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या सुशोभिकरणाचे काम डिसेंबरनंतर करण्यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यामुळे नाट्यगृहांच्या कामाचा पडदा कधी उघडणार अशा प्रश्‍न नाट्य रसिकांनी उपस्थित केला आहे. 

वाशीतील सिडकोने उभारलेले नाट्यगृह पाहता ऐरोलीमध्ये नाट्यगृह उभारण्याची मागणी रसिकांकडून करण्यात येत होती. त्याची दखल घेत 2014मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ऐरोलीत आधुनिक नाट्यगृह उभारण्यास सुरुवात झाली. या कामाचा उद्घाटनसोहळाही निवडणुकांच्या तोंडावर पार पडला होता. 2016 अखेर हे नाट्यगृहाचे काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र 2018 हे वर्ष संपत आले तरी नाट्यगृहाचे काम अद्याप सुरूही झाले नाही. सुरुवातीला अडीच कोटींचे हे काम महावीर कन्स्ट्रक्शनला देण्यात आले होते. भूमिपूजानंतर वीस टक्के काम झाले होते. यात दोन ते अडीज कोटी खर्चही झाले आहेत. त्यानंतर हे काम थांबले. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विषय समजून घेऊन कंत्राटदाराला काम सुरू करण्याचे आदेश दिले होते, परंतु त्याने आपली आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे कारण सांगत काम सुरू करण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे मुंढे यांनी त्याला काळ्या यादीत टाकले. नाट्यगृहाच्या उभारणीसाठी पुन्हा निविदा काढण्याचे निर्देश दिले. मुंढे यांची बदली झाल्यानंतर पुनर्निविदेचा प्रश्नही मागे पडला. या नाट्यगृहाच्या उभारणीसाठी पाहिल्या वर्षी अर्थसंकल्पात 25 कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्या नंतर हे काम 15 कोटींवर आले. मात्र निधीची तरतूद होत असली, तरी काम मात्र खोळंबलेले होते. या वर्षीच्या अर्थसंकल्पात या नाट्यगृहासाठी 25 कोटींची तरतूद करण्यात आली. यात वाढ करत या कामासाठी 30 कोटी 67 लाखांची निविदा काढण्यात आली आहे. त्यामुळे यावेळी तरी हे काम व्यवस्थित सुरू होईल, अशी आशा आहे.

तसेच विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या सुशोभिकरणाचे काम दोन वेळा पुढे ढकलल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्याने पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत नाट्यगृहाच्या तारखांचे वाटप करा, अशा सूचना प्रशासनाने व्यवस्थापनाला केल्या आहेत. त्यामुळे नाट्यगृहाचे सुशोभिकरण होईल की नाही, असा प्रश्न नाट्यरसिकांना पडला आहे. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या वास्तूची दुरवस्था झाल्याने या इमारतीची डागडुजी आणि सुशोभिकरण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. येथील भिंतींचा रंग उडाला असून मेकअप रूमचीही दुरवस्था झाली आहे. नाट्यगृहाची वातानुकूलित यंत्रणाही जुनी झाल्याने ती बदलणे आवश्यक आहे. ध्वनीक्षेपक यंत्रणाही बदलण्याची गरज भासू लागली आहे. याबाबत वर्षभरापासून अनेक तक्रारी येत होत्या. 

लोकप्रतिनिधीकडूनही आवाज उठवण्यात आला होता. त्यानंतर नाट्यगृहाच्या डागडुजीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात हे काम सुरू झाले नाही. नाट्यगृहाच्या डागडुजी आणि सुशोभिकरणासाठी दोन वेळा निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र त्यांना योग्य प्रतिसाद न आल्याने हे काम सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे पुढच्या दोन महिन्यांच्या तारखावाटप सुरू करा, अशा सूचना भावे नाट्यगृह प्रशासनाला पालिकेच्या वतीने देण्यात आल्या.