Breaking News
गॅस पाईपलाईनसाठी खोदलेल्या रस्त्यांवर तात्पुरता मुलामा
कामोठे ः कामोठे वसाहतीत जागोजागी महानगर कंपनीचे गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. बऱ्याच ठिकाणी हे काम पुर्ण झाले आहे. परंतु या कामासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांची मात्र चाळण झाली आहे. खोदलेले रस्ते पुन्हा व्यवस्थित डांबरीकरण करुन पादचाऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्याऐवजी केवळ माती आणि खडीचा भरणा करुन तात्पुरती मलमपट्टी केली आहे. यामुळे वाहनांना विशेष करुन दुचाकी चालकांना अडथळे येत असून पादचाऱ्यांनाही त्रास होत आहे.
गॅस सिलिंडरऐवजी थेट पाइपलाइनद्वारे स्वयंपाकाचा गॅस घरोघरी पोचविण्यासाठी महानगर गॅस लिमिटेड कंपनीच्या वतीने कामोठेतील रस्त्यांची खोदाई करून गॅस पाईपलाइन टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे. यासाठी संबंधित कंपनीने रस्त्यांचे खोदकाम केले होते. हे काम करतानाही संपुर्ण रस्ता अडविला जात होता. रस्त्याच्या कडेला पाइपलाइन खोदताना 50 ते 100 मीटर खोदून तेथील काम पूर्ण झाल्यानंतर पुढील खोदाई करावी, असे अटी व शर्तींमध्ये नमूद होते. मात्र तरीही एकाचवेळी अनेक सेक्टरमध्ये लांबलचक सलग रस्ते खोदल्याने अंतर्गत वाहतुकीसाठी रस्ते बंद असल्याने वळसा घालून गंतव्यस्थानी जावे लागत होते. आता बऱ्याच ठिकाणी हे काम पुर्णत्वास गेले आहे. परंतु खोदलेले रस्ते शिस्तबद्धपद्धतीने बुझवणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता केवळ खोदलेल्या मातीचाच भरणा करुन त्यावर खडी, दगड पसरवले आहे. क्वचित ठिकाणी डांबराच्या पाण्याचा मुलामा दिला आहे. ढोबळमानाने केलेल्या या कामामुळे बऱ्याच ठिकाणी खोदलेल्या जागी चढउतार निर्माण झाले आहेत. तात्पुरत्या केलेल्या मलमपट्टीचा नागरिकांना चालतानाही त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकीस्वारांना अनेक अडथळे येत असून वाहने घसरून लहान-मोठे अपघात होत आहेत. त्यात पावसाळा तोंडावर असल्याने जागोजागी पाणीसाचून रस्त्यावर चिखल होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या रस्त्याची चांगल्याप्रकारे दुरुस्ती करण्याची मागणी रहिवाशी करत आहेत. या कामाची चौकशी करुन काम अटी व शर्तीनुसार न केल्याचे सिद्ध झाल्यास कारवाई करावी अशी मागणीही जोर धरु लागली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस