Breaking News
नवी मुंबई पालिका व शाळा प्रशासनाचा संयुक्त उपक्रम
नवी मुंबई ः आषाढी एकादशीनिमित्त नवी मुंबईत अनेक शाळांमधून विठ्ठलमय वातावरणात विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा रंगला. नवी मुंबई पालिका आणि ज्ञानदीप सेवा मंडळाचे प्राथमिक, माध्यमिक विदयालय, करावे यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ‘आषाढी एकादशी स्वच्छता दिंडी' हे विशेष आकर्षण ठरले. यामध्ये महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाने विठ्ठल भक्तीप्रमाणेच समाजहिताला प्राधान्य देत प्रबोधनाचीही संदेश सर्वदूर प्रसारीत केला आहे. त्याचे प्रतिबिंब या स्वच्छता दिंडीतून उमटलेले दिसले.
नवी मुंबईतील विविध नोडमध्ये वारकऱ्यांच्या वेशभुषेतील लहान मुले, विठ्ठल-रखुमाई, पालखी मिरवणुक, तुळशी वृंदावन डोईवर घेऊन टाळांच्या गजरात नाचणारी चिमुकली पाऊले पाहून विठ्ठल नामाची शाळा भरल्याचा भास परिसरात होत होता. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर बेलापूर विभागात करावेगाव परिसरात स्वच्छता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबईपालिका आणि ज्ञानदीप सेवा मंडळाचे प्राथमिक, माध्यमिक विदयालय, करावे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘आषाढी एकादशी स्वच्छता दिंडी' मध्ये सहभागी 250 हून अधिक विदयार्थी, विदयार्थिनींनी ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम' तसेच ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल' या नामघोषासह स्वच्छतेचे संदेश प्रसारित करीत ‘निश्चय केला, नंबर पहिला' घोषणेने सारा परिसर दुमदुमून टाकला. शाळेच्या पटांगणापासून सुरु झालेली ही स्वच्छता दिंडी करावे, नेरुळ परिसरात साधारणत: दीड किलोमीटर फिरुन पुन्हा शाळा पटांगणात नामाचा गजर करीत परतली.
महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा जपणाऱ्या आषाढी दिंडीला स्वच्छतेची जोड देऊन ज्ञानदीप सेवा मंडळाच्या शाळेतील मुख्यध्यापक व शिक्षकांनी पुढाकार घेत स्वच्छता दिंडीचे आयोजन केले ही प्रशंसनीय गोष्ट असल्याचे मत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी पालिका अधिकारी, कर्मचारी यांच्यासह ज्ञानदीप शाळेचे मराठी माध्यम मुख्याध्यापक बंकट तांडेल व इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक रत्नाकर तांडेल आणि संस्था कार्यकारिणी सदस्य हरिश्चंद्र तांडेल तसेच इतर शिक्षकवृंद, शालेय कर्मचारी उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस