केमिकलमुळे प्रदूषणात वाढ

नागरिकांना श्वसनाचा त्रास

उरण ः उरण तालुक्यातील जासई ग्रामपंचायत हद्दीतील आणि चिर्ले गावाजवळ वसलेल्या वैष्णो लाँजिस्टिक यार्ड मध्ये लागलेल्या आगीमुळे हवेत घातक केमिकल्स पसरले आहेत. त्यामुळे हवेतील प्रदूषणात वाढ झाली असून रहिवाशांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच यार्ड मधिल घातक केमिकल्स नाल्याव्दारे खाडी परिसरात पसरल्याने खाडीतील मासे मूत्यूमुखी पडले आहेत. 

उरण तालुक्यातील जासई ग्रामपंचायत हद्दीत आणि चिर्ले गावाजवळ वसलेल्या वैष्णो लाँजिस्टिक या मालाची आयात-निर्यात करणार्‍या यार्ड मध्ये ( गोदामात) सोमवारी सकाळी टँकर मधील ज्वलनशिल ( घातक) केमिकल्सला आग लागली. या आगीत एक कामगार गंभीररित्या भाजला असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर यार्ड मध्ये घातक केमिकल्स व टायरचे एकूण 16 टँकर असल्याने त्यातील घातक केमिकल्स (हजारडस्ट) दोन टँकर मधिल ज्वलनशिल रसायने गटाराव्दारे वाहत खाडीत पसरल्याने या परिसरातील खाडीमधिल मासे मूत्यूमुखी पडू लागले आहेत. सदर आग आटोक्यात आणण्यासाठी आग्निशम दलाच्या जवानांना 48 तासांच्या शर्यतीच्या प्रयत्नांनंतर यश आले असले तरी घातक केमिकल्स हवेत पसल्याने आता येथील रहिवाशांना तेथून ये-जा करणार्‍या नागरिकांच्या श्वसनाला त्रास जाणवू लागला आहे. या आगीची चौकशी करून दोषी व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या कुंदा ठाकूर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी केली आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी राहूल मोटे यांना या घटने संदर्भात विचारणा केली असता त्यांनी माहिती देताना सांगितले की वैष्णो लाँजिस्टिक यार्ड मध्ये लागलेल्या आगीसंदर्भात आमची कारवाई सूरू आहे. तसेच खाडीत पसरलेल्या रासायनिक द्रव पदार्थाची तसेच खाडीतील मुत्यू पावलेल्या माशांची घटना स्थळावर जाऊन माहिती घेत आहोत. तसेच पुढे येणार्‍या अहवाला नंतर वैष्णो लाँजिस्टिक यार्डवर कारवाई केली जाईल.