अपात्रतेचा चेंडू सभापतींच्या कोर्टात
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 25, 2023
- 762
नवी मुंबई ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह सोळा आमदारांना सभापती राहुल नार्वेकर यांनी बजावलेल्या अपात्रतेच्या नोटीसीबाबत संबंधितांनी 6,500 पानांचा खुलासा दाखल केला आहे. शिवसेना हा शिंदे गटाचा पक्ष असल्याचा निर्णय निवडणुक आयोगाने दिल्याने त्याचा वापर संबंधित आमदारांनी आपल्या बचावासाठी केल्याचे खात्रीलायक सुत्रांकडून कळते. त्यामुळे या आमदारांच्या खुलाशावर सभापती कोणता निर्णय घेतात याकडे आता संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेत बंडखोरी करुन सत्ता स्थापन केल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी विरुद्ध गटाकडील आमदारांच्या विरोधात अपात्रतेसंबंधी विधानसभा अध्यक्षांकडे केलेल्या याचिकांची सुनावणी सुरू झाली आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेताना कोणकोणत्या कायदेशीर बाबींचा आधार घ्यावा याची चौकट सर्वोच्च न्यायालयाने सभापती राहुल नार्वेकर यांना घालून दिली आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने सुयोग्य वेळेत सुनावणी घेऊन निकाल देण्याबाबत निर्देश दिले आहेत. सभापती नार्वेकर यांनी पाठवलेल्या नोटीसांना शिंदे गटाच्या आमदारांकडून एकूण 6500 पानांचे उत्तर देण्यात आले आहे. आमदारांच्या लेखी उत्तराची चाचपणी विधिमंडळ सचिवालय करणार असून त्यानंतरच सुनावणी होणार आहे. आमचा पक्ष हाच मूळ शिवसेना असून आमच्या पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने विधानसभा अध्यक्षांना पाठविलेल्या उत्तरात केला आहे. ठाकरे गटाच्या आमदारांची उत्तरे लवकरच सादर करण्यात येणार आहेत.
दरम्यान, शिवसेनेच्यावतीने सभापती नार्वेकर यांनी लवकरात लवकर सुनावणी घेण्याबाबत याचिका दाखल करण्यात आल्यानंतरच सभापतींनी संबंधित आमदारांना नोटीसा पाठविल्याचे दिसत आहे. त्यामुळे आमदार अपात्रतेबाबतच्या कारवाईस आता वेग येण्याची शक्यता आहे. मात्र या सर्व उत्तरांचा अभ्यास करुन निष्पक्ष चौकशी करण्यासाठी सर्वांची बाजू ऐकून घेणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया नार्वेकर यांनी यापुर्वी दिली होती. त्यामुळे नैसर्गिक न्याय तत्वानुसार हा निर्णय व्हायचा झाल्यास त्यास वेळ लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपात्रतेच्या नोटीशी संदर्भातील खुलासा संबंधित आमदारांकडून प्राप्त झाल्यामुळे आता कारवाईचा चेंडू सभापतींच्या कोर्टात गेला असल्याने व सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन निर्णय घ्यायचा असल्याने ‘बकरे की माँ कब तक खैर मनाएगी' अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे गटाकडून देण्यात आली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai