Breaking News
पंतप्रधान कार्यालयाची राज्य सरकारला सूचना
उरण : कांदळवनाच्या संरक्षणाकडे राज्याच्या कांदळवन विभागाने दुर्लक्ष केल्याने पर्यावरणवाद्यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने राज्य सरकारला 4 हेक्टरवरील कांदळवन वन विभागाला हस्तांतरित करण्याच्या सूचना दिल्याची माहिती पर्यावरणवाद्यांनी दिली आहे. त्यामुळे उरण पनवेलसह नवी मुंबईतील सिडको आणि महसूल विभागाच्या ताब्यातील जवळपास 40लाख तिवराच्या झाडांना जीवदान मिळणार असल्याचे बोलले जाते.
सप्टेंबर 2018 मध्ये मुंबई उच्च न्यायालाने महाराष्ट्रातील संपूर्ण कांदळवनांच्या संरक्षणासाठी ती वन विभागाला हस्तांतरित करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतरही यामध्ये दिरंगाई होत होती. याची तक्रार पंतप्रधानांकडे करण्यात आली होती. खारफुटींच्या ऱ्हासाकडे आणि किनारपट्टीच्या संरक्षणाच्या मागणीकडे जुलैमध्ये नॅटकनेक्ट फाउंडेशनने पंतप्रधानांचे लक्ष वेधले होते. यासंदर्भात खारफुटी वन विभागाला हस्तांतरित करण्यासाठी चार वर्षांपेक्षा जास्त विलंब झाल्याची तक्रार पंतप्रधानांकडे केली होती, अशी माहिती नॅटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी दिली आहे.
राज्य कांदळवन कक्षाने 3 हजार 948.36 हेक्टर खारफुटी क्षेत्र सिडको आणि महसूल विभागाच्या अखत्यारीत असल्याचे लेखी मान्य केले होते. सिडकोला 30 ऑक्टोबर 2022 मध्ये 1200 हेक्टर खारफुटी क्षेत्र हस्तांतरित करण्याचे निर्देश दिल्याचे खारफुटी कक्षाचे अध्यक्ष आणि अतिरिक्त प्रमुख वन संरक्षक एस.वी.रामाराव यांनी नॅटकनेक्टला लेखी दिल्याचे कुमार यांनी सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai