Breaking News
मुंबई ः राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी किसान क्रेडिट कार्डवरील राष्ट्रीय परिषदेचे औचित्य साधून “सिल्व्हर पॉम्फ्रेट” अर्थात “पापलेट” हा राज्य मासा म्हणून जाहीर केला. ‘मच्छीमार हे समुद्राचे राजे म्हणून ओळखले जातात. त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी या किसान क्रेडिट कार्डचा उपयोग होईल,' असा विश्वास राष्ट्रीय परिषदेत बोलताना मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्याच्या मासेमारी उद्योगात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासोबत पापलेट मासा त्याची स्वादिष्ट चव आणि अपवादात्मक पौष्टिक मूल्यासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील पर्यावरण आणि मासेमारी अर्थव्यवस्थेत पापलेटला विशेष स्थान आहे. पापलेट नामशेष होऊ नये म्हणून प्रबोधन व नियमन होण्याच्या दृष्टिकोनातून तो राज्य मासा म्हणून घोषित करण्याच्या मागणीचे निवेदन सातपाटी येथील दोन्ही मच्छीमार सहकारी संस्थांकडून सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आले होते. सिल्व्हर पॉम्फ्रेट माशाला स्थानिक पातळीवर पापलेट किंवा सरंगा म्हणून ओळखले जाते. पालघर जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रात पापलेट मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने हे क्षेत्र “गोल्डन बेल्ट” म्हणून प्रसिद्ध आहे. पापलेट हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त निर्यात केल्या जाणाऱ्यांपैकी व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचे आणि पसंतीचे एक सागरी अन्न आहे. महाराष्ट्र राज्य मत्स्य विभागाने सिल्व्हर पॉमफ्रेटचे महत्त्व जाणून ऑक्टोबर 2022 मध्ये टपाल तिकीटसुद्धा प्रसिद्ध केले आहे.
आययूसीएन या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेद्वारे जगातील प्रजातींच्या उपलब्ध संख्येच्या आधारे वर्गवारी करून त्याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात येत असते. या माहितीप्रमाणे पापलेट मासा “नामशेष न झालेल्या” वर्गवारीत मोडत असला तरी महाराष्ट्र राज्यातील सिल्वर पॉम्फ्रेटच्या मत्स्योत्पादनामध्ये मागील काही वर्षांमध्ये विशेष घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब लक्षात घेता महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पॅम्पस (सिल्वर पॉम्फ्रेट) या उल्लेखनीय मत्स्य प्रजातीचे जतन करण्यासोबतच सागरी परिसंस्थेचे रक्षण, लहान मासळीच्या मासेमारीला आळा घालणे आणि शाश्वत मासेमारी पद्धतींना प्रोत्साहन देण्याच्या महत्त्वपूर्ण गरजेबद्दल जागरूकता वाढविणे आवश्यक आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यात सिल्वर पॉमफ्रेट मासा “राज्य मासा” म्हणून घोषित करण्याचा निर्धार मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी झालेल्या राष्ट्रीय परिषदेत केला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai