शिक्षक दिनी शिक्षकांचा सन्मान
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 07, 2023
- 347
नवी मुंबई ः शिक्षक दिन हा देशाचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शिष्यवृत्तीसह इतर स्पर्धा परीक्षा, विज्ञान तंत्रज्ञान प्रकल्प स्पर्धा, शालांत बोर्ड परीक्षा यामध्ये गुणवंत विदयार्थी घडविणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई हे समृध्द विचारांचे शहर असून दरवर्षी पटसंख्या वाढणारे महानगरपालिकेचे शिक्षण व्हिजन कौतुकास पात्र आहे व यामागे शिक्षकांचे फार मोठे योगदान असल्याचे मत व्यक्त करीत आमदार गणेश नाईक यांनी शिक्षण विभागाचा शाळानिहाय पॅटर्न तयार करण्याची सूचना केली. याप्रसंगी बोलताना आमदार मंदाताई म्हात्रे यांनी त्यांच्या शालेय जीवनातील आठवणी सांगत शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त केला. दोन्ही आमदारांनी ठोक मानधनावरील शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याच्या सूचना महापालिकेला केल्या.
कोव्हीड कालावधीमुळे मागील तीन वर्ष होऊ न शकलेला शिक्षक दिन समारंभ यावर्षी उत्साहात साजरा होत असल्याबद्दल आयुक्तांनी समाधान व्यक्त केले तसेच दोन्ही आमदारांनी उल्लेख केलेल्या ठोक मानधनावरील शिक्षकांच्या मानधन वाढीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही आयुक्तांनी सांगितले. याप्रसंगी सुप्रसिध्द साहित्यिक, वक्ते प्रा.प्रवीण दवणे यांनी ‘अध्यापनाचे दीपस्तंभ' या विषयावर शिक्षकांशी सुसंवाद साधत त्यांचे प्रबोधन केले. मान्यवरांच्या शुभहस्ते 10 वी शालांत परीक्षेत 100 टक्के निकाल लागलेल्या सन 2022 व 2023 या शैक्षणिक वर्षातील नमुंमपा माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांसह शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे सन 2021, 2022, 2023 या वर्षातील पाचवी व आठवी इयत्तेतील शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये गुणवंत विदयार्थी घडविणाऱ्या शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांचाही गौरव करण्यात आला. तसेच चेन्नई येथील युवा शास्त्रज्ञ प्रदर्शनात सहभागी विदयार्थी समुहाचे मार्गदर्शक शिक्षक त्याचप्रमाणे अगत्स्या फाऊन्डेशन, थिंग बिग सायन्स कार्निव्हल आणि बाल वैज्ञाानिक परिषद व जिल्हास्तर विज्ञान परिषद यामध्ये सहभागी विदयार्थी समुहाचे मार्गदर्शक शिक्षक यांनाही सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र समन्वयक, माध्यमिक शाळा समन्वयक, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये तांत्रिक सहाय्य करणारे शिक्षक, सर्व शिक्षा अभियानातील विषयतज्ज्ञ, एमआयएस समन्वयक, आयई समन्वयक, रिसोर्च टिचर तसेच डॉक्टरेट पदवी धारण केलेले नमुंमपा शाळांतील चार शिक्षक अशा 328 शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
नमुंमपा शाळा क्रमांक 42, घणसोली गाव येथील विदयार्थी समुहाने ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. गुणवंत विदयार्थी घडविणाऱ्या शाळांना सन्मानचिन्ह तसेच त्या शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांना प्रशस्तीपत्र आणि ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai