दहिहंडी उत्सवाला न्यायालयाच्या नियमांचे थर
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 07, 2023
- 558
रस्त्यांवर, चौकात दहिहंडी नको, नव्यानं धोरण निश्चित करण्याचे निर्देश
मुंबई : राज्यभरात दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला जातो. मुंबई व उपनगरात हा उत्सव अतिशय थाटात व जल्लोषात साजरा होताना दिसतो. मात्र यापुढच्या वर्षीपासून रस्त्यावर किंवा चौकात दहीहंडी उत्सव साजरा करण्यास परवानगी देऊ नका. तर मोकळ्या मैदानात दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी नियोजन करा. त्यासाठी नव्यानं धोरण निश्चित करा, वेळेचे बंधन घाला व मंडळांची संख्या कमी करा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं बुधवारी राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे पुढच्यावर्षीपासून बालगोपाळांच्या उत्सवात न्यायालयाच्या नियमांचे थर लागणार आहेत.
मुंबईसारख्या शहरात परंपरा, संस्कृती जपताना सामाजिक भानही राखलं पाहिजे. आयोजकांनीही बदलत्या परिस्थितीचा नीट अभ्यास करायला हवा. मुंबई सारख्या शहरांमध्ये लोकसंख्या वाढत चालली आहे. पण पायाभूत सुविधा आजही 50 वर्षांपूर्वीच्याच आहेत, रस्त्यांची लांबी वाढलेली नाही. पण वाहतूककोंडी प्रचंड वाढली आहे. रस्त्यावर उत्सवाला परवानगी दिल्यानं त्याचा नाहक त्रास सर्वसामान्यांना होतो. त्यामुळे वर्षानुवर्षे सुरू असलेल्या परंपरा आता कुठेतरी बदलायला हव्यात. त्यासाठी नवीन धोरणच निश्चित करण्याची आवश्यकता आहे. हे धोरण असं तयार करा की सण उत्सवांमुळे वाहतूककोंडी होणार नाही, गर्दी होणार नाही, नागरिकांना त्रास होणार नाही. निदान पुढील वर्षी तरी उत्सवाआधी हे धोरण निश्चित करा, असे आदेश न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती फिरदोस पुनावाला यांच्या खंडपीठानं हे आदेश दिले आहेत. ठाकरे गटाचे कल्याण शहर प्रमुख सचिन दिलीप बासरे यांनी ॲड. जयेश वाणी आणि ॲड. सिद्धी भोसले यांच्यामार्फत हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे आदेश पारित केले आहेत.
- परवानगी देण्याआधी स्वतःला प्रश्न विचारा - हायकोर्ट
सण-उत्सवांसाठी धोरण निश्चित करणाऱ्यांनी सध्याची लोकसंख्या आणि पायाभूत सोयीसुविधांचा विचार करायला हवा. रस्त्यावर किंवा चौकात उत्सवाला परवानगी देण्याआधी स्वतःला प्रश्न विचारा. तसेच पहिला अर्ज केला म्हणून त्याला परवानगी दिली, ही पद्धत आता बदलायला हवी. सर्व बाजूंचा विचार करूनच परवानगी द्यायला हवी. मोकळ्या जागेत किंवा मैदानात दहिहंडीचे आयोजन कसे केले जाईल? याचा विचार करा, अशी सूचना हायकोर्टाने केली आहे. - मंडळाची व गोविंदांची संख्या कमी करा - हायकोर्ट
दहिहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या मंडळाची व गोविंदांची संख्याही आता कमी करायला हवी. आज पाच हजारजण सहभागी होतायत. पुढे जाऊन ही संख्या 50 हजारांवर जाईल. याला कुठे तरी आळा बसायलाच हवा. त्यामुळे किमान 10 ते 50 मंडळेच सहभागी होऊ शकतील, असा नियम करा. मंडळांमध्ये किती गोविंदा असावेत यावरही निर्बंध आणा. जेणेकरुन गर्दी होणार नाही, अशी सूचनाही न्यायालयाने केली आहे. - वेळेचंही निर्बंध आणा
दहिहंडी उत्सव आयोजित करणाऱ्या एकाच आयोजकाला दिवसभराची परवानगी देऊ नका. सहा तास एका आयोजकाला द्या. पुढील सहा तास दुसऱ्या आयोजकाला द्या. जेणेकरून सर्वांना मोक्याच्या ठिकाणी हा उत्सव साजरा करण्याची संधी मिळेल. उत्सव साजरा झाल्यानंतर संबंधित जागेची साफसफाई करण्याची जबाबदारी त्या मंडळाची असेल, असाही नियम करा, असेही न्यायालयानं नमूद केलं आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai