पत्रकार समाजाला प्रेरणा देऊ शकतो
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 09, 2023
- 359
ज्येष्ठ साहित्यिक, संपादक विजय कुवळेकर यांचे मत
नवी मुंबई : पत्रकार समाज बदलू शकत नाही, तर समाजाला प्रेरणा देऊ शकतो. समाजाला काय हवं यासोबत समाजाला काय द्यावं हा विचार माध्यमांनी करणे गरजेचे आहे. तपशिलाच्या अचूकतेमधून विश्वासार्हता येते. तरुणाईला वाचनाकडे वळविणे हे मोठे आव्हान असून आपण वाचतो तेव्हाच विचार करतो असे सांगत समाजमाध्यमांमुळे विचार व्यक्त करण्याचे सामर्थ्य मिळते. असे विचार ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि संपादक विजय कुवळेकर यांनी वाशी येथे व्यक्त केले.
ज्येष्ठ पत्रकार कै. अशोक जालनावाला यांच्या जयंती निमित्ताने वाशी येथील विष्णुदास भावे नाटगृह आयोजित पत्रकारिता ‘आजची आणि उद्याची ' या परिसंवादाचे अध्यक्षीय भाषण करताना विजय कुवळेकर बोलत होते. यावेळी, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक पराग करंदीकर, पत्रकार, लेखक, राजकीय विश्लेषक राजू परुळेकर हे प्रमुख वक्ते परिसंवादात सहभागी झाले होते. तर आमदार गणेश नाईक, मंदा म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व्यासपीठावर उपस्थित होते. आज जगात ज्ञानाची क्षेत्रे विस्तारली आहेत. त्यामुळे या क्षेत्राचा अभ्यास करणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यवसायाची मुल्ये असतात. उथळपणा, शिवराळपणाला विविध माध्यमातून अवाजवी प्रसिद्धी मिळते. लोकशाही टिकवण्यासाठी सर्व नागरिकांनी जागृत राहिले पाहिजे. कारण उत्तम हुकूमशाहीपेक्षा वाईट लोकशाही कधीही चांगली असते असे प्रतिपादन विजय कुवळेकर यांनी यावेळी केले.
पत्रकारिता आजची आणि उद्याची हा खरंतर वाद विवाद स्पर्धेचा विषय असू शकतो. नेत्यांच्या गाडीतून फिरणारे पत्रकार काल होते. त्यावरून त्यांची ओळख निर्माण होती आज पत्रकार नेत्यांच्या गाडीतुन फिरले तर ते लाचार वाटतील. प्रत्येक माध्यमाच्या गरजा वेगळ्या असतात. डिजिटल माध्यमांमध्ये ब्रेकिंग न्यूजसाठी सेकंदाची लढाई सुरु असते. महाराष्ट्रात दर तीन दिवसात एका पत्रकारावर हल्ला होतो. हे हल्ले रोखण्यासाठी प्रयत्न अपुरे पडत आहेत. समाजातला सोशिसपणा संपत चालला आहे. सगळ्याचबाबतीत समाजाला पत्रकारांकडून अपेक्षा असतात. सध्या पत्रकारांसाठी आव्हानांचा काळ असल्याचे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक पराग करंदीकर परिसंवादात आपले मत मांडताना म्हणाले.
प्रिंट मिडियाचे स्वतःचे स्थान आहे, सामर्थ्य आहे. टीव्हीचे देखील वेगळे महत्त्व आहे. काळानुसार लोकांना आवडते ते देण्याचा प्रयत्न माध्यमांनी केला पाहिजे. समाजाने पत्रकारांकडून असाधारण अपेक्षा करु नयेत. समाजाची मुल्य व्यवस्था पत्रकार बदलू शकत नाहीत. पत्रकाराचे काम प्रश्न मांडणे आहे, सोडविणे नाही. तटस्थ पत्रकार ही काल्पनिक गोष्ट असून भविष्यात तंत्रज्ञान बदलामुळे पत्रकार कालबाह्य होत जातील. त्यामुळे पत्रकारिता ही तंत्रज्ञान-विज्ञान व समाज कसा प्रतिसाद देतो या गोष्टींवर अवलंबून असल्याचे परखड मत राजू परुळेकर यांनी व्यक्त केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai