मोरबे जलपूजन वादाच्या भोवऱ्यात
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 30, 2023
- 365
3 अभियंत्यांना कारणे दाखवा तर सुरक्षा रक्षकांसह भाजपा पदाधिकारीही गोत्यात
नवी मुंबई : समाधानकारक पर्जन्यवृष्टीमुळे नवी मुंबई महापालिकेचे मोरबे धरण पूर्ण भरले आहे. धरणाच्या साठ्याने 88 मीटर इतकी उंची गाठली असून शनिवारी मध्यरात्री दुथडी भरून वाहू लागले आहे. त्यामुळे पाणीटंचाई दूर होणार असल्याने नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. परंतु, मोरबे धरणातील जल पूजनाची स्टंटबाजी सध्या नवी मुंबईत चर्चेचा विषय बनली आहे. राजकारण्यांच्या हट्टापायी अभियंता, सुरक्षा रक्षक गोत्यात आले असून धरणावर बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी भाजपा पदाधिकाऱयांवर होणार गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सततच्या पावसामुळे धरणे भरले असून 88 मीटर साठ्याची सर्वोच्च पातळी गाठली आहे. मोरबे धरण प्रकल्प क्षेत्रात यंदा 3549 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सद्यःस्थितीत 190.890 दशलक्ष घनमीटर साठा उपलब्ध असून धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. मोरबे धरणाचे दरवाजे 15 सेमीने उघडले असून 675 क्यूसेक इतका विसर्ग करण्यात आला. प्रसिध्दीच्या झोतात येण्यासाठी व आपल्या विरोधकांना खजील करण्यासाठी नवी मुंबईतील भाजपच्या पदाधिकाऱयांनी मोरबे धरणातील जल पूजनाची स्टंटबाजी करुन आपलं इफ्सित साध्य केलं खरं. परंतु, त्यांच्या या स्टंटबाजीचे परिणाम मोरबे धरणावर कार्यरत असलेल्या महापालिका अभियंत्यांना व सुरक्षा रक्षकांना झेलावे लागत आहेत.
मोरबे धरणाच्या निषिध्द क्षेत्रात विनापरवानगी जबरदस्तीने घुसून जलपूजन करणारे नवी मुंबईतील माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, सुधाकर सोनावणे व अन्य भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार महापालिकेच्या अभियंता विभागाने खालापूर पोलिस ठाण्यात दिली आहे. तसेच नवी मुंबई जिल्हा काँग्रेसने देखील भाजपाच्या या स्टंटबाजीचा निषेध करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. अखेर नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सदर घटनेची गंभीर दखल घेत महापालिकेच्या तीन अभियंत्यांना (इंजिनिअर्सना) कारणे दाखवा नोटीस बजावून तीन दिवसात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये कार्यकारी अभियंता (मोरबे धरण) सुभाष सोनावणे, उपअभियंता वसंत पडघन व कनिष्ठ अभियंता अशोक मोरे यांचा समावेश आहे. तर मोरबे धरणाची सुरक्षा व्यवस्था पाहणारे तीन सुरक्षा रक्षक व पर्यवेक्षक (सुपरवाझर) यांच्या विरोधात महापालिका प्रशासनाने प्रशासकीय कारवाई सुरु केली असून त्यांच्या डोक्यावर निलंबनाची टांगती तलवार लटकत आहे.
दरम्यान, मोरबे धरणाच्या निषिद्ध क्षेत्रात विनापरवानगी प्रवेश करून जलपुजन करणाऱयांवर लवकरच गुन्हा नोंद केला जाणार असल्याची माहिती खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाला कुंभार यांनी दिली. त्यामुळे माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, यांच्यासह अन्य माजी महापौर आणि माजी नगरसेवक, नगरसेविका यांच्यावर निषिध्द क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्रवेश केल्याप्रकरणी (ट्रेसपासिंग) गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
- तक्रारीत काय म्हटले आहे?
महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष सोनवणे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, सदर लोकप्रतिनिधी मोरबे धरणावर जलपूजनासाठी पूजा साहित्य व भटजी असे सर्व तयारीनिशी आलेले होते. त्या वेळी धरणाच्या नानिवली दरवाजावर सुरक्षा रक्षक हरेश तांडेल यांच्यासह अन्य सुरक्षा रक्षक उपस्थित होते. त्यांनी या लोकप्रतिनिधींना विरोध केला; मात्र त्यांनी सुरक्षा रक्षकांना न जुमानता धरण क्षेत्रात प्रवेश करत हे जलपूजन करण्यात आले. ही बाब प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवानगी प्रवेश करण्याच्या नियमांचे उल्लंघन करणारी आहे. तसेच धरण प्रतिबंध कायद्याचेही उल्लंघन केले आहे. त्यामुळे आरोपींवर गुन्हे नोंद करण्यात यावेत, अशी मागणी तक्रार अर्जात करण्यात आली आहे. त्यांनी यासंदर्भात पुरावे म्हणून छायाचित्र आणि व्हिडीओ दिले आहेत. या विषयी खालापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंभार यांनी सांगितले की, सदर तक्रार प्राप्त झाली असून लवकरच संबंधितांचा जबाब नोंदवून याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai