Breaking News
खारघर, घणसोली पाठोपाठ नेरुळमध्ये चालत्या बसला अचानक लागली आग; सुदैवाने जिवीतहानी नाही
नवी मुंबई ः प्रवाशी संख्या वाढविण्यासाठी एनएमएमटीकडून विविध सेवा पुरविल्या जात असून नवीन बसही टप्प्याटप्प्याने ताफ्यात दाखल होत आहेत. मात्र हे सर्व असतानाही प्रवाशांची सुरक्षा मात्र धोक्यात आली आहे. काही दिवसांपुर्वी खारघरमध्ये एनएमएमटीच्या बसला आग लागली होती. हे आग सत्र सुरुच असून पुन्हा एकदा घणसोली येथे नव्या कोऱ्या इलेक्ट्रिक बसला अचानक आग लागून बसची अर्धी जळून खाख झाली. या वाढत्या आग सत्रामुळे प्रवाशांनी चिंता व्यक्त केली आहे.
ना नफा ना तोटा या तत्वावर सुरु असणाऱ्या परिवहन उपक्रमांकडून प्रवाशांच्या सोयीसाठी विविध उपक्रम राबविले जातात. प्रवाशी संख्या वाढवण्यासाठी अनेक सवलती व सोयी सुविधा दिल्या जातात. तसेच नवीन विद्युत व एसी बस टप्प्याटप्प्याने परिवहनच्या ताफ्यात दाखल होत आहेत. मात्र यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. काही दिवसांपुर्वी खारघरमध्ये चालु बसला अचानक आग लागली. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. त्याची पुनरावृत्ती सोमवारी घणसोली येथे झाल्याचे पाहायला मिळाले. या घटनेत नव्या कोऱ्या बसने अचानक पेट घेतला. त्यामुळे वरुन चकाचक दिसणाऱ्या बसचा असा जिवघेणा बिघाड चिंताजनक ठरत आहे.
घणसोली आगारातून सोमवारी सायंकाळी घणसोली ते मुलुंड ही मार्ग क्रमांक 144 ही बस निघाली. मात्र बस मध्ये बिघाड झाल्याने एन एम एम टी प्रशासनाने दुसऱ्या बसची सोय केली. सदर बस मधील तांत्रिक बिघाड तात्पुरता दुरुस्त करण्यात आला. बस पुन्हा घणसोली डेपो कडे मार्गक्रमण करत असताना ऐरोली रबाळे अंतर्गत रस्त्यावर सेंट झेव्हीयर्स शाळेनजीक बस मधून अचानक धूर येणे सुरू झाले. त्यावेळी बस रिकामी व केवळ वाहन चालक असल्याने त्यांनी रस्त्याकडेला बस उभी करुन बाहेर उडी मारली. या नंतर काही क्षणात बसने आग पकडली व काही क्षणांत अर्धी बस जळून राख झाली. याबाबत चौकशीचे आदेश दिले जातील अशी माहिती एनएमएमटी व्यवस्थापक योगेश कडूस्कर यांनी दिली.
चालक व वाहतुक पोलीसांच्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात
नवी मुंबई : धावती बस पेट घेत असतानाच बस चालक व वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे वेळीच आग आटोक्यात येऊन मोठी दुर्घटना टळली. बुधवारी रात्री जेएनपीटीला जाणारी एमएमएमटीची इलेक्ट्रिक बस नेरूळमध्ये आली असता पुढच्या चाकाखालून धूर निघत असल्याचे चालकाच्या निदर्शनात आल्याने बस थांबवण्यात आली. त्याचवेळी वाहतूक पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेऊन सुमारे 20 प्रवास्यांना सुरक्षित खाली उतरवण्यात आले.दोन दिवसांपूर्वीच ऐरोलीत धावत्या एनएमएमटी बसला आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर बुधवारी पुन्हा एका एनएमएमटीच्या इलेक्ट्रिक बसला आग लागत असतानाच ती आटोक्यात आणण्यात आली. जेएनपीटीला जाणारी 34 क्रमांकाची इलेक्ट्रिक बस नेरुळ पुलाखाली आली असता बसच्या पुढच्या भागातून धूर निघत होता. हा प्रकार बस चालक किरण कणसे यांच्या नजरेस पडले. यामुळे त्यांनी तातडीने बस रस्त्यालगत घेतली. त्याचवेळी सदर ठिकाणी तुर्भे वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत धरणे व सहकारी पोळ, भोसले, घोरपडे, काचगुंडे वाहतूक नियंत्रित करत होते. बसमधून धूर निघत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतसोबत असलेल्या अग्निरोधकाचा वापर करून आग आटोक्यात आणली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस