नेतेपदावरुन सेनेत नाराजी
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 20, 2023
- 332
मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमध्ये वावरणाऱ्यांना नेतेपद
मुंबई ः शिवसेनेने 16 नेत्यांची कार्यकारिणी जाहिर केली असून त्यामध्ये मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमध्ये वावर असणाऱ्या नेत्यांचा समावेश केल्याने पक्षात मोठी नाराजी पसरली आहे. राज्यातल्या एकाही मोठ्या चेहऱ्याला या कार्यकारिणीत स्थान न मिळाल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर आयते कोलीत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिले असून त्याचा फटका बसण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेत नेते, उपनेते, सचिव व उपसचिव ही पदे निर्माण करुन त्यावर ते आपल्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना बहाल करत असत. शिवसेना स्थापनेपासून सोबत असलेल्या मनोहर जोशी, दत्ताजी साळवी, सुधीर जोशी, प्रमोद नवलकर, दत्ताजी नलावडे, मधुकर सरपोतदार, लिलाधर ढाके व सुभाष देसाई यांना कायम शिवसेनेचे नेतेपद बहाल केले होते. वरील सर्व नेत्यांकडे मोठे जनसमर्थन नसले तरी त्यांच्याकडे संघटन कौशल्य आणि उत्तम वकृत्व असल्याने नेतेपदाला त्यांनी न्याय दिला होता. बाळासाहेबांच्या सेनेत गणेश नाईक, आनंद दिघे, चंद्रकांत खैरे, नारायण राणे यासारखे नेते कधीही नेतेपदापर्यंत पोहचले नाहीत याबाबत सेनेत नेहमीच चर्चेचा विषय बनला होता.
परंतु, उद्धव ठाकरे यांच्याकडे कार्याध्यक्षपद आल्यानंतर त्यांनी त्यामध्ये बदल करुन आपल्या मर्जीतील एकनाथ शिंदे, संजय राऊत सारख्या नेत्यांना नेतेपद बहाल केले. नुकत्याच सेनेत झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे राज्यातील काही प्रमुख चेहऱ्यांना नेतेपदाची माळ घालतील अशी अपेक्षा अनेकांना होती, परंतु उद्धव ठाकरे यांनी नव्याने आदित्य ठाकरे, विनायक राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, अनिल परब, सुनील प्रभु, राजन विचारे, चंद्रकांत खैरे, भास्कर जाधव व रविंद्र वायकर यांना नेतेपदी बढती दिली आहे. ठाकरे यांनी कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर त्याचे नकारात्मक पडसाद सेनेत उमटले असून राजन विचारे, चंद्रकांत खैरे, भास्कर जाधव हे वगळून मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमध्ये राबता असलेल्या नेत्यांचाच समावेश केल्याचा आरोप नाराज नेते करत आहेत. ठाण्याच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या मीना कांबळी यांनी ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र करुन शिंदे सेनेचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर या नियुक्तींमुळे बंडाळी होण्याची शक्यता वर्तवली जात असून त्याचा फायदा शिंदे सेनेला होणार असल्याचे राजकीय समिक्षकांचे मत आहे.
मातोश्रीवर विनायक राऊत, रविंद्र वायकर, अनिल देसाई व अनिल परब यांचा वावर असून उद्धव ठाकरे यांना भेटायचे असेल तर मातोश्रीची ही चौकट आधी ओलांडावी लागते. जमिनस्तरावर सेनेत काय सुरु आहे याचा थांगपत्ता उद्धव ठाकरे यांना ही चौकट कधीच लागू देत नाही. बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे हे कार्यकर्त्यांना काही काळ भेटत होते पण आता मातोश्रीवर पुन्ह या चौकटीचेच राज्य असल्याची खंत नाराजांनी व्यक्त केली आहे.
- दानवे नाराज?
शिवसेनेने नेत्यांची यादी जाहीर केल्यावर त्यात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे नाव नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. दानवे यांनी आपण नाराज नसल्याचा खुलासा जरी केला असला तरी या नियुक्तीमुळे विरोधकांना योग्य तो संदेश गेल्याने सेनेतील धाकधुक पुन्हा वाढली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai