तळोजातील उद्योगांना प्रक्रियायुक्त पाणी
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 27, 2023
- 326
नवी मुंबई : ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील वाढत्या नागरिकीकरणामुळे उद्योगांसाठी आरक्षित असलेले पाणी नागरी वस्त्यांकडे वळवावे लागत असल्याने औद्योगिक पट्टयात पाणीटंचाई आहे. या पार्श्वभूमीवर तळोजा औद्योगिक पट्टयातील उद्योगांना प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडको आणि औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) घेतला आहे. मेसर्स दीपक फर्टिलायझर या कंपनीला पहिल्या टप्प्यात 15 दशलक्ष लिटर प्रक्रियायुक्त पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे तळोजा एमआयडीसी पट्टयात आतापर्यंत 866 हेक्टर जमीन उद्योगांसाठी संपादित करण्यात आली आहे. या पट्टयात आंतरराष्ट्रीय पातळीचे तसेच लघुउद्योग मोठया संख्येने आहेत. सद्य:स्थितीत येथील उद्योगांना एमआयडीसीच्या बारवी धरणातून दिवसाला 52 ते 54 दशलक्ष लिटर प्रति दिन पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. गेल्या काही वर्षांपासून ठाणे जिल्ह्यातील नागरी वस्त्यांमधील पाण्याची मागणी वाढल्याने बारवी धरणातून उद्योगांना केला जाणाऱ्या पाणीपुरवठयात कपात करण्यात आली आहे. तळोजा उद्योगपट्टयाचा झालेला विस्तार आणि लगतच्या शहरीकरणामुळे येथील पाण्याची मागणी दिवसागणिक वाढू लागली आहे. त्यामुळे या उद्योगांकडूनही पाण्याचा पुरवठा वाढावा, अशी मागणी होत आहे. या औद्योगिक पट्टयातील दीपक फर्टिलायझर ॲण्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड या कंपनीने एमआयडीसीकडे वाढीव पाण्याची मागणी केली आहे. सिडकोने याच पट्टयात सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाण्याचा 40 दशलक्ष लिटरचा मोठा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात 15 दशलक्ष लिटर पाणी प्रति दिन उपलब्ध होत असून हे पाणी एमआयडीसीच्या तळोजा येथील जलकुंभापर्यंत आणून देण्याची तयारी सिडकोने दाखवली आहे. एमआयडीसीच्या जलकुंभापासून कंपनीपर्यंत हे पाणी नेण्यासाठी आवश्यक असलेली जलवाहिनी आणि पुढे साठवण टाकी उभारण्याची सुविधा एमआयडीसीकडून केली जाणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले हे पाणी पिण्यासाठी वापरात आणले जाणार नाही. मात्र, इतर वापरांसाठी या पाण्याचा वापर केला जाणार असल्याने उद्योगांना पर्यायी पाण्याचा एक मोठा स्रोत यामुळे उपलब्ध होणार आहे. या पाण्याचा उपयोग तळोजा औद्योगिक वापरासाठी करण्यात येणार असून यासंबंधीचा एक करार नुकताच सिडको आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळादरम्यान करण्यात आला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai