Breaking News
पनवेल : अत्यंत वेगाने विकसित होणाऱ्या पनवेल महापालिका क्षेत्रातील पाण्याची चिंता मिटावी, म्हणून पाण्याचे स्रोत नव्याने निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी पनवेलपासून 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्यातील टाटा जलविद्युत केंद्र, रवाळजे, भिरा येथून 517 एमएलडी पाणी आणण्याच्या पनवेल महापालिकेच्या प्रस्तावाला पाटबंधारे विभागाने सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. कोलाड कार्यकारी अभियंता आणि ठाणे अधीक्षक अभियंता यांनी, पनवेल महापालिकेकडून मोठा महसूल प्राप्त होणार असल्याचे नमूद करत याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रालयात पाठवला आहे.
सुमारे 110 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या पनवेल महापालिका क्षेत्रात सध्या पाण्याची भीषण टंचाई भेडसावत आहे. कायमच वादात असलेली पाणीपुरवठ्याची सुविधा महापालिकेच्या गळ्यात टाकण्याच्या तयारीत सिडको आहे. त्यामुळे भविष्यातील लोकसंख्या लक्षात घेऊन पनवेल शहरासाठी पाण्याचे नवे स्रोत निर्माण करणे महापालिका प्रशासनाला क्रमप्राप्त आहे. महापालिकेच्या मालकीच्या धरणाची उंची वाढवणे शक्य झालेले नाही. तसेच नवे धरण बांधणे सद्यस्थितीत शक्य नाही. परिणामी, उपलब्ध स्रोतांमधून पाणी मिळवणे हा एकच पर्याय शिल्लक आहे. रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका असल्यामुळे, जिल्ह्यातील स्रोतांचा शोध घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील टाटा जलविद्युत केंद्र, रवाळजे, भिरा येथून कुंडलिका नदीत सोडले जाणारे पाणी पुढे कुंडलिका नदीवरील काळ सिंचन प्रकल्पात डोलवहाल वळण बंधारा येथे अडवून कुंडलिका डावा व उजवा तीर कालव्याव्दारे अंबा नदीत सोडून सिंचन आणि इतर कारणांसाठी वापरण्यात येते. काळ सिंचन प्रकल्पाअंतर्गत एकूण 1822 एमएलडी पाणीसाठा उपलब्ध आहे. यापैकी सिंचन, बिगरसिंचन, औद्योगिक कारणासाठी पाणी वितरित करून 174 दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक राहते. 14 दशलक्ष घनमीटर सिंचनामधील पाणी तरतुदींमधून वर्ग केल्यास महापालिकेच्या प्रस्तावानुसार 188 दलघमी, म्हणजेच 517 एमएलडी पाणी महापालिकेला देणे शक्य आहे, असे रायगड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद पवार यांनी अधिक्षक अभियंता कार्यालयाला पाठवलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai