वन डे संपाचा 3 दिवस फटका
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 06, 2024
- 322
नवी मुंबई ः हिट अँड रन प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या नवीन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी सोमवारी अचानक बंद पुकारल्याने सुमारे 25 हजारपेक्षा अधिक वाहने थांबली. त्यामुळे जेएनपीएमधील पाचही बंदरातील मालवाहतुकीवर परिणाम झाला होता. बंदर परिसरातील रस्ते, उड्डाणपूलांवर शुकशुकाट होता. तसेच धान्य, भाजीपाला आयातीवरही त्याचा मोठा परिणाम झाला. आवक घटल्याने भाजीपाल्याचे दरही वधारले होते.
रस्ते अपघातात अपघातग्रस्तास मदत न केल्यास 10 वर्षांची शिक्षा या नव्या कायद्याविरोधात ट्रकचालक रस्त्यावर उतरले असून जेएनपीटीकडे जाणारा मार्ग ठप्प झाला होता. या कायद्याविरोधात ट्रक, डंपर, कंटेनर चालकांनी जेएनपीटीकडे जाणारा मार्ग रोखून आंदोलन छेडले होते. त्याला पोलिसांनी अटकाव करत असताना, समजूत काढत असताना काही ट्रक चालकांनी सामान्य गाड्यांना लक्ष करीत काठ्यांनी हल्ला केला. यात अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या. एवढ्यावरच हे थांबले नाहीत, तर रस्त्यावर दगड टाकण्यात आले. पोलिसांवर दगडफेक केली गेली आणि काठ्यांनी काही पोलिसांना मारहाण केली गेली. पोलिसांनी अधिक कुमक मागवली आणि लाठीचार्ज करीत 50 पेक्षा अधिक ट्रक चालकांना ताब्यात घेतले आहे.
संध्याकाळी संप मागे घेण्यात आला मात्र दोन दिवस मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आवकेवर त्याचा परिणाम सुरूच राहिला. बुधवारी धान्यासह मसाल्याच्या पदार्थांची आवक कमी झाली. कांद्याची आवक सुरळीत असली तरी बटाटा व लसणाची आवक मंदावली. धान्य व मसाल्याच्या दरामध्ये फार परिणाम झालेला नाही, परंतु वाटाणा, टोमॅटो, कोबीसह काही भाज्यांच्या दरामध्ये वाढ झाली. फळ मार्केटची आवकही निम्यावर आली आहे. दोन दिवसांमध्ये हिरवा वाटाणा प्रतिकिलो 25 ते 35 वरून 45 ते 55 रुपयांवर गेला आहे. टोमॅटो 12 ते 28 वरून 15 ते 33, ढोबळी मिर्ची 32 ते 52 वरून 45 ते 55 वर पोहोचली. एकुणच भाजीपाल्याची आवक 10 टक्क्यांनी, फळांची 25 टक्के, कांदा-बटाटा 20 टक्के, तर अन्नधान्याची 55 टक्के आणि साखर-मसाल्याची 65 टक्के आवक कमी झाली आहे.
- पेट्रोल पंपावर हाणामारी
मंगळवारी सर्वत्र पेट्रोल पंपावर झुंबड उडाली असतानाच शिळफाटा मार्गावरील महापे येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल नाकारल्याने वाहनधारक व पंप कर्मचारी यांच्यात हाणामारीची घटना समोर आली आहे. यामध्ये दुचाकीस्वाराने पंप कर्मचाऱ्याच्या अंगावर दुचाकी घालून हत्येचा प्रयत्न केला. मात्र याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात संबंधितांची तक्रार नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. - एनएमएमटी कोलमडली
आंदोलनामुळे टँकर पोहोचू न शकल्याने पेट्रोल-डिझेलसह गॅसची वाहतूक मंदावली. त्याचा फटका नवी मुंंबई महापालिकेच्या परिवहन सेवेला (एनएमएमटी) बसला. यामुळे परिवहन सेवेचे वेळापत्रक बऱ्यापैकी कोलमडे. - पोलिसांचा बंदोबस्त
वाहतूकदार हिंसक होऊ नयेत यासाठी नवी मुंबई, उरण-पनवेल परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. सायन-पनवेल, ठाणे-बेलापूर, मुंबई-पुणे, जेएनपीटी ते पनवेल, मुंबई-गोवा आणि एक्स्प्रेस वेवर पोलिस होते. अनेक ठिकाणी वाहतूकदारांनी रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली होती.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai