Breaking News
पनवेल ठरली राज्यातील पहिली महापालिका
पनवेल ः महापालिकेचा मालमत्ता कर विभाग तसेच महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्रित मालमत्ता हस्तांतरण प्रणाली सुविधेचा शुभारंभ 5 जानेवारी,2024 रोजी करण्यात आला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी' या कार्यक्रमांतर्गत लोणेरे, माणगाव येथे करण्यात आला. राज्यभरात ही सुविधा राबविणारी पनवेल महानगरपालिका ही पहिली महापालिका ठरली आहे.
व्यवसायपूरकता या उपक्रमांतर्गत नागरी स्वराज्य संस्थामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध नागरी सेवा (इंटिग्रेटेड वेब बेस्ड पोर्टल) मार्फत एकात्मिक स्वरूपात सोयी सुविधा देण्याच्या दृष्टीने पनवेल पालिकेच्यावतीने एक पाऊल पुढे टाकले आहे. पालिकेच्यावतीने देण्यात येणाऱ्या सुविधा अधिक पारदर्शक होण्याच्या दृष्टीने ही नवीन सुविधा सुरू करण्यात येणार आहे. एखाद्या मालमत्तेची खरेदी विक्री झाल्यानंतर त्या मालमत्तेची मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) आणि करदाता अभिलेख (टॅक्स पे रेकॉर्ड) यांवरती नोंद केली जाते. महापालिका देणार असलेल्या या नवीन सुविधेअंतर्गत महापालिका हद्दीतील मालमत्ता खरेदी-विक्री करतेवेळी सहाय्यक निबंधक पनवेल यांच्याकडे नोंद करताना महापालिकेच्या कर देयकावरील मालमत्ता सांकेतिक क्रमांक आपल्या दस्तामध्ये नोंद करणे आवश्यक असणार आहे. तसेच मालमत्ताधारकांनी मालमत्ता खरेदी करताना मालमत्तेचा मालमत्ता कर थकबाकीसह पूर्ण भरणा केलेबाबत खातरजमा करुन पावती आपल्या दस्तास जोडणे आवश्यक आहे. मालमत्ताधारकांनी आपल्या नोंदणी दस्तामध्ये मालमत्ता सांकेतिक क्रमांक नमूद केल्यास आपले नाव महापालिकेच्या मालमत्ता कर प्रणालीत तात्काळ दाखल होणार आहे. यामुळे खरेदीदाराला पालिकेकडे करदाता म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी वेगळा अर्ज करावा लागणार नाही, तसेच मालमत्ताधारकांना आपले स्वत:चे कर देयक पालिकेच्या वेबसाईटवरती सहजरित्या उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांनी दिली आहे.
याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, विधान परिषद आमदार निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, विधानसभा आमदार भरत गोगावले, प्रशांत ठाकुर, रविंद्र पाटील, महेंद्र थोरवे, महेश बालदी, महेंद्र दळवी, डॉ. बाबासाहेब तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे कुलगुरु प्रा.डॉ. कारभारी काळे, विभागीय आयुक्त कोकण विभाग डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, आयुक्त गणेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थिती होती.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai