भूमीपुत्रांना आरक्षण लागू होणार

मुंबई : खासगी क्षेत्रामध्ये भूमीपुत्रांसाठी आरक्षण लागू करण्यात येईल, अशी घोषणा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या अभिभाषणात केली. उद्धव ठाकरे सरकारनं बहुमत सिद्ध केल्यानंतर दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राज्यपालांचं अभिभाषण झालं. यामध्ये सरकारची पुढची वाटचाल कशी असेल, याचं निवेदन झालं. 

राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी हे राज्यशासन वचनबद्ध आहे. खासगी क्षेत्रात स्थानिकांना 75 टक्के आरक्षण लागू करणारे आंध्र प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले होते. आध्र प्रदेशच्या विधानसभेत याबाबतचा कायदा मंजूर केला गेला होता. तीन वर्षात याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी स्थानिकांना 75 टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी ते सत्तेत येताच पूर्ण देखील केले. त्यानंतर मध्य प्रदेश सरकारने देखील खासगी क्षेत्रात 70 टक्के आरक्षणाची घोषणा केली होती. त्यानंतर कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्रात अशी मागणी होऊ लागली होती.10 रुपयांमध्ये सकस थाळी देण्याची लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल, अशी घोषणाही यावेळी करण्यात आली. याखेरीज अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना लवकर आणि जास्तीत जास्त मदतीचं आश्वासनही सरकारनं दिलं आहे.