Breaking News
महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष ; यंत्रणेअभावी टाकी ओव्हर फ्लो
नवी मुंबई ः स्वच्छ सर्र्वेेक्षण अंतर्गत नवी मुंबई महापालिकेतर्फे विविध ठिकाणी सार्वजनिक शौचालये,अत्याधुनिक व स्वयंचलित ई-टॉयलेट्स उभारले आहेत. मात्र अनेक ठिकाणी या सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली आहे. तसेच नियोजनाअभावी या शौचालयातील पाण्याच्या टाक्या ओव्हर फ्लो होत असल्याने पाण्याची नासाडी होत आहे. सानपाडा पामबीच मार्गावर मोराज सर्कल जवळ असलेल्या ई-टॉयलेटवरील टाकीमधून महिनाभरापासून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकीकडे पाणी जपून वापरा म्हणून आवाहन करणारी पालिकाच पाण्याची नासाडी करत असल्याने नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे.
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये सहभाग घेताना महापालिकेने शहराचा कायापालट करण्याचे ठरवले तेव्हा शहरातील शौचालयांकडे विशेष लक्ष दिले. यानुसार शहरातील जुनी शौचालये पाडून नवी सार्वजनिक शौचालये उभारण्यात आली. काही ठिकाणी तर फिरती शौचालयेही उभी करण्यास सुरुवात झाली. काही मोजक्या ठिकाणी ई-टॉयलेट बांधून पालिकेने आधुनिकपणा दाखवला. आज या ई-टॉयलेटची संख्या 20 च्या पुढे आहे. या शौचालयात 5 रुपयांचे नाणे टाकल्यावर ते उघडते. मात्र त्याच्या वापराबाबत अनेकांचा गोंधळ उडाल्याने ते सुरुवातीपासूनच चर्चेत राहिले. अनेक ठिकाणी या ई-टॉयलेटची दुरावस्था झाली आहे. काही ठिकाणी अस्वच्छता पसरलेली असते. प
पालिकेने अत्याधुनिक शौचालये बांधली मात्र त्यात पाण्याचे योग्य नियोजन केले नाही. पाण्याची सोय करण्यासाठी शौचालयात पाण्याच्या टाक्या उपलब्ध केल्या आहेत. मात्र या पाण्याच्या टाक्यात पाणी भरल्यानंतर पाणी बंद करण्याची सुविधा व यंत्रणा नसल्याने अनेक टाक्या ओव्हर फ्लो होऊन पाणी वाया जात आहे. सानपाडा पामबीच मार्गावरील मोराज सर्कल जवळ असलेल्या ई-टॉयलेटवर असलेल्या पाण्याच्या टाकीमधून गेला महिनाभर पाणी वाहत आहे. यामुळे हजारो लीटर पाणी वाया जात आहे. मागील महिनाभरापासून हा प्रकार सुरु असून त्याच्या दुरुस्तीकडे आणि योग्य यंत्रणा उपलब्ध करुन देण्याकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. एकीकडे पालिका पाणी जपून वापरण्याचे आवाहन नागरिकांना करत आहे. यासाठी विभागवार एक दिवस पाणीकपातही केली जाते. परंतु दुसरीकडे अशा पद्धतीने पाणी वाया जात असल्याने पालिकेच्या या भोंगळ कारभाराविषयी नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस