बामणडोंगरी घरांच्या किंमती 6 लाखांनी कमी
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 25, 2024
- 1286
शासनाच्या आदेशानुसार सिडकोचा निर्णय
नवी मुंबई ः सिडको महागृहनिर्माण योजना दिवाळी-2022 योजनेतील बामणडोंगरी येथील लाभार्थ्यांना 27 लाखात (सरकारी अनुदानासह) घराचा ताबा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने दिलेल्या आदेशानुसार बामणडोंगरी, उलवे, नवी मुंबई येथील घरांच्या (सदनिका) किंमती रु. 6 लाखांनी कमी करण्याचा निर्णय सिडको महामंडळाकडून घेण्यात आला आहे. यामुळे मूळ रु. 35 लाख 30 हजार किंमतीची सदनिका रु. 29 लाख 50 हजार या किंमतीला उपलब्ध होणार आहे.
सिडको महामंडळामार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अर्जदारांकरिता महागृहनिमार्ण योजना दिवाळी 2022 राबविण्यात आलेली होती. दि. 17 फेब्रुवारी 2023 रोजी सदर योजनेची संगणकीय सोडत काढण्यात आली असून एकूण 4869 अर्जदार बामणडोंगरी येथील गृहप्रकल्पासाठी विजेते ठरले होते. सिडको महामंडळातर्फे परिपूर्ण कनेक्टिव्हिटी लाभलेल्या नवी मुंबईच्या उलवे नोडमध्ये सदर गृहनिर्माण योजना साकारण्यात आली असून या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. यशस्वी अर्जदारांना इरादापत्रे पाठविण्यात आलेली असून, अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी व वाटपपत्र निर्गमन प्रक्रिया अंतिम टप्यामध्ये आहे. यामुळे यशस्वी अर्जदारांना लवकरच सदनिकांचा ताबा मिळणे शक्य होणार आहे. या सदनिकांच्या किंमती तब्बल रु. 6 लाखांनी कमी करण्यात येऊन, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मिळणाऱ्या रु. 2.5 लाख रक्कमेच्या अनुदानासह प्रत्यक्षात या सदनिका अंदाजे रु. 27 लाख किंमतीला उपलब्ध होणार आहेत.
सिडको महागृहनिर्माण योजना दिवाळी-2022 मधील बामणडोंगरी येथील यशस्वी अर्जदार हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उत्पन्न मर्यादा रू. 3 लाखापर्यंत असल्याने घरासाठी रु. 35 लाखांची रक्कम उभी करण्यासाठी अर्जदारांना अडचणी येत होत्या. हे लक्षात घेऊन या अर्जदारांना दिलासा देण्याकरिता बामणडोंगरी येथील सदनिकांच्या किंमती कमी करण्याबाबतचे निर्देश सिडकोला देण्यात आले होते. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार सिडको महागृहनिर्माण योजना दिवाळी-2022 मधील बामणडोंगरी येथील सदनिकांच्या किंमती रु. 6 लाखांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सदर योजनेतील यशस्वी अर्जदारांना दिलासा मिळून त्यांचे नवी मुंबईमध्ये हक्काचे घर घेण्याचे स्वप्न साकार होणार आहे. े- अनिल डिग्गीकर, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai