Breaking News
मुंबई ः रायगड जिल्ह्यातील भोकरपाडा येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक मार्ग काढणार असल्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. भोकरपाडा (ता. पनवेल) येथील जलशुद्धीकरण प्रकल्पातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी कामगारांना न्याय देण्याचे आणि सर्वोत्तपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
भोकरपाडा जलशुद्धीकरण प्रकल्पात 55 कंत्राटी कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी संदर्भातील प्रस्ताव भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे प्रलंबित आहेत. या प्रस्तावाचा पाठपुरावा करावा. तसेच कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सुट्ट्या देणे, वेतनवाढ आदी सुविधासंदर्भातील त्रुटी दूर करून सकारात्मक मार्ग काढण्यात येईल, असे पाटील यांनी यावेळी सांगितले. जीवन प्राधिकरणचे जलशुध्दीकरण केंद्र पनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथे असून या केंद्रात गेल्या 30 वर्षापासून वेगवेगळया पदावर अनेक कर्मचारी काम करत आहे. या कामगारांना पगारवाढ तसेच सरकारी नियमानुसार सुट्ट्या आणि इतर सुविधा दिल्या गेल्या नाहीत. उच्च न्यायालयामध्ये देखील सन 2007 मध्ये निकाल दिला असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि कामगार मंत्रालय यांनी 6 महिन्यात निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांची देणी अदा करावीत, असे आदेश दिले होते. परंतु, जीवन प्राधिकरणने कोणतीही कार्यवाही केली नाही. याबाबत 22 नोव्हेंबर 2022 रोजी गुलाबराव पाटील यांच्यासोबत बैठक होऊन कामगारांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या. मात्र, मुख्य मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. त्या अनुषंगाने गुलाबराव पाटील, संबंधीत विभागाचे अधिकारी आणि कामगार प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी आमदार बालदी यांनी कामगारांच्या व्यथा मांडताना तातडीने कार्यवाही करण्याची आग्रही मागणी केली. त्यावर पाटील यांनी कामगारांच्या पगारवाढीसंदर्भात तसेच सुट्ट्यांबाबत बोर्ड मिटींगमध्ये विषय घेणार असून चतुर्थ श्रेणी कामगारांप्रमाणे पगारवाढ करण्याचे आश्वासन दिले. तसेच सकारात्मक भूमिका घेऊन कामगारांना न्याय देण्याचे आणि सर्वोत्तपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai