मद्यपी चालकांची संख्या घटली

नवी मुंबई : मद्य पिऊन गाडी चालविणार्‍यांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वाहतूक पोलिसांकडून केली गेलेली कारवाई आणि वाढीव दंडाची रक्कम तसेच जनजागृती यामुळे ही संख्या घटल्याचे सांगितले जाते. 2018 आणि 2019 ची ऑक्टोबर या कालावधीतील तुलना करता एकूण मद्यपी चालकांच्या संख्येत 259 ने घट झाली आहे.

रस्ते अपघातातील अनेक कारणांपैकी मद्यप्राशन करून गाडी चालवणे हे एक कारण आहे. जानेवारी ते आक्टोबर 2019 या कालावधीत एक हजार 993 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात 29 लाख 90 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 2018 मध्ये याच कालावधीत दोन हजार 252 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 28 लाख 98 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या शिवाय जानेवारी ते डिसेंबर 2018 या कालावधीत एकूण दोन हजार 949 जणांवर कारवाई करण्यात आली. यात 33 लाख 95 हजार 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 2018 आणि 2019 या दोन्ही वर्षांची तुलना केल्यास केवळ जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीतील कारवाईत 2019 मध्ये 259 कारवाई कमी झाल्या आहेत तर दंड रक्कम 92 हजार 300 रुपयांनी कमी झाला आहे. 2018 मध्ये जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान दोन हजार 252 कारवाईत 28 लाख 98 हजार 200 रुपये दंडवसुली झाली होती.

जुलै, ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक कारवाई

मद्यपी वाहनचालकांवर नियमित कारवाई होते, तर 31 डिसेंबर व 1 जानेवारीला विशेष अभियान असते. मात्र, वर्षभरात सर्वाधिक कारवाई जानेवारी ते डिसेंबर त्या खालोखाल जुलै आणि ऑक्टोबरमध्ये होते.