पॅनेलचा प्रारूप आराखडा निवडणूक आयोगाकडे

नवी मुंबई ः महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथम पॅनल पद्धतीने निवडणुका होत आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने प्रभाग फेररचना केली असून त्याचे प्रारूप निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर प्रारूप प्रभाग फेररचनेवर नागरिकांच्या हरकती मागविण्यात येणार आहेत. त्यानंतर, हरकतींवर सुनावणी होऊन अंतिम प्रभाग फेररचना निवडणूक आयोगाकडे पुन्हा मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका एप्रिल 2020 मध्ये होण्याची शक्यता आहे. पनवेल, ठाणे महानगरपालिकांनंतर आता नवी मुंबई पालिकेची निवडणूक पॅनल पद्धतीने होत आहे. जनगणनेच्या आधारे पॅनलची नव्याने रचना करण्यात आली आहे. चार प्रभाग मिळून होणार्‍या एका पॅनलमध्ये प्रभाव दाखविण्याचे आव्हान पालिका सदस्यांसमोर असेल. 27 एप्रिल 2015 रोजी झालेल्या निवडणुकीत 111 प्रभाग होते. 9 मे रोजी महापौरांची निवड करण्यात आली होती. त्यामुळे हा कार्यकाल पूर्ण होण्याआधीच या निवडणुका होत आहेत.

पालिका प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पॅनलबाबत प्रारूप तयार केले आहे. नवी मुंबईची लोकसंख्या 11 लाख 19 हजार 477 इतकी आहे. रचनेनुसार कमीतकमी तीन आणि जास्तीतजास्त पाच प्रभागांचा एक पॅनल असेल. उर्वरित पॅनलमध्ये तीन वा पाच प्रभाग करण्यात आले आहेत. 40 हजार लोकसंख्येचा एक पॅनल तयार करण्यात आला आहे. अंदाजे 27 ते 28 पॅनल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पॅनल पद्धतीत 1 मतदाराला पॅनलमध्ये असलेल्या चारही प्रभागातील उमेदवारांना मतदान करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी चारही पॅनलमधील मतदारांशी नाळ जोडली जावी, अशी अपेक्षा आहे. निवणूक आयोगाने प्रारूपला मंजुरी दिल्यानंतर प्रारूप प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर हरकती व सूचना मांडण्यात येईल. त्यानंतर निवडणूक आयोगाद्वारे प्रारूपाला अंतिम स्वरूप दिले जाईल. निवडणुकीसाठी पॅनल आरक्षणाबाबतची सोडत काढण्याची तारीख आयोगाद्वारे महापालिकेला कळवली जाईल. त्यानंतर पॅनल आरक्षण पडतील. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल. 

बॉक्स

राज्यात सत्ताबदल झाल्यामुळे एप्रिल 2020मध्ये होणार्‍या नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिकेने तयार केलेल्या पॅनल पद्धतीला काही राजकीय पक्षांकडून विरोध होत आहे.