Breaking News
चोवीस लाख किंमतीची उत्पादने सील; अन्न औषध प्रशासनाची कारवाई
नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसी भागातील एका कंपनी मार्फत विदेशात पाठविण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या वेष्टनावर खाडाखोड केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नवी मुंबई मनसेच्या सहकार सेनेने ही बाब अन्न आणि औषध प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. सदर प्रशासनाने या कंपनीवर धाड टाकली असता सहकार सेनेने केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
तुर्भे औद्योगिक वसाहतीमध्ये नामांकित कंपनीचे खाद्यपदार्थ आणि थंडपेय साठवून यावरील माहितीची लेबल बदलवली जात होती. या संपूर्ण कारभाराबाबत शंका असल्याने अन्न व औषध प्रशासनाला याची तक्रार करण्यात आली होती. अन्न व औषध प्रशासनाने या गोदामांची झाडाझडती घेतल्यावर अन्न सुरक्षा मानक कायद्याची पायमल्ली केल्याचे आढळून आल्याने अधिकाऱ्यांनी चोवीस लाख रुपये किंमतीची उत्पादने सील करून अधिक तपास सुरू केला आहे. धाड टाकलेल्या एका गोदामात मोठ्या प्रमाणात वेफर्स, कुरकुरे, थंड पेय याचा साठा करून ठेवण्यात आला होता. या साठ्यावर निर्यातीच्या नावाखाली रसायन वापरून उत्पादन तारीख, कालमर्यादा (मॅन्यूफॅक्चर आणि एक्सपायरी) बदलून साठ्यातील उत्पादनांची छापील माहिती रासायनिक पदार्थ वापरत खोडण्यात येत होती. तसेच त्यावर हीच माहिती बदलून पुन्हा टाकण्यात येत होती. हा माल व्यवस्थित पॅकिंग करून विदेशात पाठवला जात होता. सदर प्रकाराबाबत मनसे सहकार सेना उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी थेट अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांना तक्रार करून गोदामांची तपासणी करण्यासाठी मागणी केली होती. शनिवारी रात्रभर सुमारे दहा तास या सर्व गोदामांची तपासणी केली. यामध्ये विदेशात ही सर्व उत्पादने पाठवण्यात येणार असल्याने उत्पादनातील माहिती बदलली जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
पाहणीदरम्यान अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी विदेशात माल पाठवणे, या ठिकाणी साठवणे, या सारख्या अनेक परवानगीबाबत विचारणा केली असता अशा प्रकारच्या कुठल्याही परवानग्या काढण्यात आल्याची कागदपत्रे संबंधित लोकांना सादर करता आली नाहीत. त्यामुळे कुठलीही परवानगी न घेता हा कारभार सुरु असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हे अन्न व औषध विभागातील अधिकाऱ्यांच्या तपासात स्पष्ट झाल्यावर अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी नमुने गोळा करून हे नमुने प्रयोग शाळेत पाठविले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai