शिवसेनेचा ‘कोहिनुर' हरपला
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 23, 2024
- 492
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन
मुंबई ः महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी, 23 फेब्रुवारीला पहाटे तीनच्या सुमारास निधन झाले. ते 86 वर्षाचे होते.
बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून मनोहर जोशी यांची ओळख होती. गेली काही वर्षे ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. गुरुवारी रात्री अत्यवस्थ वाटू लागल्याने जोशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
मनोहर जोशी यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 ला झाला. वयाच्या 27 व्या वर्षी मनोहर जोशी एम.ए.एल.एल.बी झाले. त्यानंतर शिक्षक म्हणूनही कार्यरत होते. 2 डिसेंबर 1961 ला त्यांनी नोकरी सोडली आणि कोहिनूर क्लासेसमधून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. शिक्षणापासून वंचित युवकांना तांत्रिक शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करण्याचा यामागचा त्यांचा उद्देश होता. 1967 मध्ये ते बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी जोडले गेले आणि शिवसेनेत आले. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यावर पहिल्या फळीतील शिवसैनिक म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.
राडा करणाऱ्या शिवसैनिकांच्या गराड्यात मनोहर जोशी यांचा सभ्य आणि सुसंस्कृत चेहरा शिवसैनिक म्हणून मिळाला. त्यामुळेच त्यांच्याकडे महापौरपद आलं, मुख्यमंत्रीपद आलं, तसंच मानाची जवळपास सगळी पदं भुषवली.
नगरसेवक (2 टर्म), विधानपरिषद सदस्य (3 टर्म), मुंबईचे महापौर (1976 ते 1977), विधानसभा सदस्य (दोन टर्म्स), महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 1995 ते 1999, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री (1999 ते 2002), लोकसभा अध्यक्ष (2002 ते 2004), राज्यसभेचे खासदार (2006 ते 2012)
गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली. मुख्यमंत्रीपद निवड झाल्यावर शिंदे यांनी मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते. पण या वादात पडण्याचे टाळून जोशी सरांनी शेवटपयर्यंत ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ राहण्यावर भर दिला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai