अर्बन हाट येथे चित्रपट महोत्सव

नवी मुंबई ः सिडको अर्बन हाट येथे 4 डिसेंबर ते 7 डिसेंबर, 2019 या कालावधीत सायं. 7.00 ते रात्री 9.00 या वेळेत भारतीय शास्त्रीय नृत्य या संकल्पनेवर आधारित चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. फिल्म डिव्हीजन यांच्या सहकार्याने या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

अर्बन हाट येथे सध्या सुरू असलेल्या हातमाग व हस्तकला महोत्सवा अंतर्गत सदर चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भारताच्या विविध प्रांतांतील पारंपरिक नृत्य प्रकारांना तेथील स्थानिक संस्कृतींमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. कथ्थक, कुचिपुडी, कथकली इ. पारंपरिक भारतीय नृत्य प्रकारांनी जागतिक स्तरावरही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अर्बन हाट येथे आयोजित करण्यात आलेला हा चित्रपट महोत्सव भारतीय नृत्य प्रकारांचे चाहते तसेच अभ्यासकांसाठी पर्वणी ठरणार आहे. या कालावधी दरम्यान नामांकित दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेले ड्रीमर (स्वप्न सुंदरी), यामिनी, र्‍हीदम्स ऑफ लाईफ, डानसिंग फीट असे हिंदी व इंग्रजी भाषांतील भारतीय नृत्य कलेशी संबंधित चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. प्रत्येक चित्रपट हा सरासरी 20 ते 25 मिनिटे कालावधीचा आहे. भारतीय नृत्यकलेच्या चाहत्यांनी चित्रपट महोत्सवास उपस्थित राहून या चित्रपटांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.