Breaking News
पनवेल ः खारघर येथील अश्वमेध महायज्ञावरुन घरी परतण्यासाठी तीन आसनी रिक्षातून प्रवास करताना झालेल्या अपघातामध्ये एका नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये क्षमतपेक्षा जास्त प्रवाशी भरल्याने रिक्षा कलंडून हा अपघात झाला. या अवैध वाहतुकीमुळे या बालकाला मात्र आपला जीव गमवावा लागा आहे.
गायत्री परिवाराच्या अश्वमेध महायज्ञासाठी हजारो भाविक खारघरमध्ये आले होते. राज्यातील व उपनगरातील ठिकठिकाणांहून हे भाविक खारघरमध्ये येजा करण्यासाठी अनेकांनी खासगी वाहतूकीचा वापर केला तर मोठ्या प्रमाणात तीन आसनी रिक्षातून क्षमतेपेक्षा अधिकची वाहतूक करुन भाविक महायज्ञापर्यंत पोहचत होते. रविवारी दुपारी घडलेल्या महायज्ञाच्या गेट क्रमांक चार येथील अपघातामध्ये तीन जण जखमी आणि एका बालकाचा मृत्यू झाला. जखमींवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सूरु आहेत. मृत बालकाचे नाव दिब्यप्रसाद नायक असे आहे. नायक कुटूंबिय महायज्ञासाठी सकाळी साडेसहा वाजता भिवंडी येथून खारघर येथे आले होते. दुपारी यज्ञात आहुती वाहिल्यानंतर ते घरी परतण्यासाठी तीन आसनी रिक्षातून जात असताना रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा अधिकचे प्रवासी असल्याने रिक्षा चालकाचा रिक्षावरील ताबा सुटून रिक्षा दुभाजकावर आदळली.
या अपघातामध्ये दिब्यप्रसाद याचा मृत्यू झाला तर दिब्यप्रसादची आई मंजुक्ता नायक या गंभीर जखमी झाल्या. मंजुक्ता यांच्यासोबत या रिक्षातील अन्य दोन प्रवासी जखमी असल्याचे पोलीसांनी सांगीतले. या प्रकरणी पोलीसांनी 28 वर्षीय रिक्षाचालक सतीष उतेकर याच्यावर हलगर्जीपणा रिक्षा चालविल्यामुळे गुन्हा नोंदविला आहे. मात्र या अपघातानंतर तरी येथील खारघर-तळोजा सुरु असणारी इकोव्हॅन व तीन आसनी रिक्षांमधील अवैध वाहतुक थांबेल का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai