रेल्वेचा जिना प्रवाशांसाठी खुला

पनवेल ः पनवेल रेल्वे स्टेशनवरील नवीन पनवेलकडे जाण्यासाठी बांधण्यात आलेला मोठा जिना अखेर प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे जिन्यावर होणारी गर्दी कमी होऊन अपघात टळण्यास मदत होणार आहे.  

मध्य रेल्वेच्या पनवेल स्टेशनच्या फलाट क्रमांक 1 ते 4 वरून रोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणे आणि अंधेरी अशा 333 लोकलच्या फेर्‍या होतात. याशिवाय फलाट 5 ते 7 वरून मेल व एक्स्प्रेसच्या नियमित 57 आणि तीन हॉलिडे एक्स्प्रेस गाड्या जातात. येथून रोज लाखो प्रवासी ये-जा करीत असतात. पनवेलच्या पूर्वेला म्हणजेच नवीन पनवेल बाजूला मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढली आहे. या बाजूला येताना फलाट 5वरील अरुंद जिन्याने वर जावे लागत होते. सकाळ-संध्याकाळी आणि मेलगाडी आल्यावर लोकलच्या प्रवाशांची वर जाण्यासाठी होणारी गर्दी अपघाताला निमंत्रण देणारी ठरत होती. त्यामुळे स्टेशन सल्लागार समितीने आ. प्रशांत ठाकूर यांच्यामार्फत रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.

पनवेल रेल्वे स्टेशनवरील फलाट क्रमांक 4वर नवीन स्वच्छतागृह बांधण्यात येत आहे. त्याच्यासमोर नवीन जिना बांधण्यात आला आहे. सदर जिन्यावर जाण्याचा मार्ग हा पूर्वीच्या जुन्या जिन्याच्या सुरुवातीच्या अरुंद भागातून ठेवण्यात आल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे या नवीन जिन्याचे काम थांबवून त्याचा वर जाण्याचा मार्ग बदलावा, अशी मागणी सल्लागार समितीने केली होती. त्याप्रमाणे जिना बांधण्यात आला. तो पूर्ण झाल्याने आता प्रवाशांनी त्याचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी होणारी प्रवाशांची अडचण दूर झाली.