Breaking News
भाजप नेत्यांसह शिंदे गटाचा घेतला समाचार
उरण ः या जनसंवाद मेळाव्याला कोणतेही निवडणूक किंवा कोणतेही स्वार्थ नसताना देखील मोठया प्रमाणात एकत्र आलात. बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले, कट्टर निष्ठावंत शिवसैनिक एवढ्या मोठया प्रमाणात आज एकत्र दिसले हि गर्दी बघून निश्चित भविष्यात उरण विधानसभा मतदार संघात आमदार पदाचे उमेदवार मनोहरशेठ भोईर व मावळ लोकसभा मतदार संघात संजोग भिकू वाघेरे पाटील बहुमताने निवडून येतील. त्यामुळे या उमेदवारांना बहुमताने निवडून देण्यासाठी जात पात धर्म बाजूला ठेवून देश वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. सर्वांनी एकत्र या आणि गद्दारांना फेकून दया असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उरण येथे केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल खालापूर उरण या तीन विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे कार्याध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या झंजावाती दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उरण तालुक्यात नवीन शेवा मैदान द्रोणागिरी नोड उरण येथे भव्य दिव्य अशा जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जनसंवाद मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख यांनी उपस्थित शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. ठाकरे यांनी या मेळाव्यात भाजप व शिंदे सरकारच्या विविध भ्रष्ट कारभाराचे वाभाडे काढले. ते म्हणाले की मला अभिमान आहे की ठाकरे कुटुंबात जन्मलो. आमच्या कुटुंबाला राजकीय वारसा आहे. आमच्या कुटुंबाला एतिहासिक वारसा देखील आहे. माझ्यावर घराणेशाहीचा नेहमी आरोप होतो. मात्र भाजपची घराणेशाही कोणाला दिसत नाही. देशात हुकूमशाही लादली जात आहे. मोदी वेगवेगळे कायदे करून देशाचे मोठया प्रमाणात नुकसान करत आहेत. अमित शहा, मोदी यांनी स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्यांचा बळी घेतला आहे. या भाजपा पक्षाचा व त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा देश स्वातंत्र्य चळवळीत कोणतेही योगदान नाही. आम्ही काँग्रेस सोबत गेलो पण हिंदुत्ववाद सोडला नाही. जात पात धर्म बाजूला ठेवून देश वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र या. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपा 100 हुन जास्त जागा जिंकू शकत नाही .आज संपूर्ण भारतात मोदी व भाजपा विरोधात संतापाची लाट पसरली आहे. इतर पक्षातील लोक, नेते पदाधिकारी आयात करून त्यांना पक्षात घेतले जात आहे. त्यामुळे भाजपा पक्षाने निष्ठावंत व प्रामाणिक एकनिष्ठ पदाधिकारी कार्यकर्त्यांवर खूप मोठया प्रमाणात अन्याय केला आहे. आज भाजपा कडे 8000 कोटीहुन जास्त निधी जमा झाला आहे. भाजपकडे एवढ्या मोठया प्रमाणात निधी आला कुठून? इडी, तसेच विविध जप्ती, छापा टाकून कंपनी वर दबाव टाकून भाजपने हा निधी मिळविला आहे. हि निधी म्हणजे भ्रष्टाचार आहे.राज्यात शाळा, कॉलेज, हॉस्पिटल यांची परिस्थिती बेकार आहे. वेगवेगळ्या सेवा सुविधा उपलब्ध नाहीत. अमली पदार्थचे प्रमाण राज्यात वाढले आहे. याला केंद्र व राज्य सरकार कारणीभूत आहे. आम्ही कोणत्याही निवडणुकीला घाबरत नाहीत. शिवसेनेचे चिन्ह गेले तरी आम्ही नाव मात्र घेऊ देणार नाही. 25 वर्षे भाजप सोबत युती केली,25 वर्षे भाजपची पालखी वाहिली आता हि पालखी वाहणार नाही. आता शिवसेनेला अंकुर फुटला आहे. नासकी पाने, खराब पाने गळून पडली आहेत. आता शिवसेनेने नव्याने जन्म घेतला आहे. शिवसेनेला नव्याने अंकुर फुटले आहे. यापुढील उरण विधानसभा मतदार संघांचे उमेदवार मनोहरशेठ भोईर तर मावळ लोकसभा मतदार संघांचे उमेदवार संजोग भिकू वाघेरे पाटील हेच असतील त्यांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन करत उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद सभेत सर्वांना संबोधित केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai