Breaking News
अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांचा महिलांना सल्ला
नवी मुंबई : स्वभाव कितीही सकारात्मक असला तरी एखादे काम आपल्या मनाविरुद्ध होत असेल तर "नाही" म्हणायला शिका."नाही'' हा शब्दही महिलांच्या डिक्शनरीत असलाच पाहिजे असा सल्ला अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी महिला पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यात दिला.
नवी मुंबई जर्नालिस्ट वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने नवी मुंबई महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षामध्ये महिला पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, विधीतज्ज्ञ ॲड. वंदना दळवी, पोलीस अधिकारी शुभांगी पाटील लाभल्या होत्या. तसेच अभिनेत्री श्रेजा म्हात्रे, गोल्ड मेडल विजेत्या कुस्तीपटू राजश्री बांगर यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये विविध वृत्तपत्रांच्या आणि वृत्तवाहिनींच्या महिला पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
सदर प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले म्हणाल्या की, आजचे जीवन हे फार धावपळीचे आहे. या काळात महिलांनी स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण महिलांच्या खांद्यावर अख्या कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी असते. त्यामुळे आरोग्याला जपा वेळप्रंसगी स्वतःचे डॉक्टर स्वतःच व्हा आणि सकारात्मक निर्णय घेऊन ते अमंलात आणा. आपल्या मुलांवर चांगले संस्कार झाले तरच भावी पिढी उत्तम होईल, अन्यथा फार मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रंसगी विधीतज्ज्ञ ॲड. वंदना दळवी यांनी विविध कलमांची माहिती देत अन्याय सहन करु नका वेळीच सावध होऊन खंबीर बना असे सांगितले. पोलीस अधिकारी शुभांगी पाटील यांनी वाढणाऱ्या सायबर क्राईमपासून सावध राहून तंत्रज्ञान हाताळा असा सल्ला दिला. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जर्नालिस्ट वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक शेशवरे, प्रमुख सल्लागार विश्वरथ नायर, सचिव नागमणी पाण्डे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब दारकुंडे व अनिलकुमार उबाळे यांनी केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस