Breaking News
अभिनेत्री विद्या सावळे आणि तिच्या जुळ्या मुली दिसणार एकत्र
अभिनयाचे बाळकडू जेव्हा घरातूनच मिळतं तेव्हा आपल्या पालकांच्या पावलावर पाऊल ठेवून कलाकारांची मुलं अभिनयाकडे वळतात. लहानपणापासून आपल्या कलाकार आई-वडिलांमध्ये पाहिलेले अभिनय कौशल्य, सोबतीला त्यांच्याकडून मिळालेले मार्गदर्शन यामुळे मुलांना त्यांच्या अभिनयाच्या प्रवासात एक आत्मविश्वास मिळतो. असाच एक प्रवास सुरू झाला आहे कलाकार मायलेकींचा. कलाकार आई आणि तिच्या दोन जुळ्या मुली अशी ही माय लेकींची जोडी लवकरच मराठी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचणार आहे. “सन मराठी”वर “काँस्टेबल मंजू” ही नवीन मालिका येत्या 18 मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेत्री विद्या सावळे आणि त्यांच्या जुळ्या मुली नेहा आणि निकिता मम्मीसाहेब आणि सवी- कवी या भूमिका साकारणार आहेत. आई आणि तिच्या जुळ्या मुली यांना छोट्या पडद्यावर एकत्र पाहण्याचा योग सन मराठीने जुळवून आणला आहे.
कॉन्स्टेबल मंजू ही मालिका मंजिरी वाघमारे उर्फ मंजू आणि सत्या या दोन पात्रांवर आधारित आहे. मंजिरी वाघमारे उर्फ मंजू ही तिच्या वाघमारे या आडनावाप्रमाणे बिलकुल धाडसी नाही. मंजू ही भित्री जी जवळजवळ प्रत्येकाला आणि प्रत्येक गोष्टीला घाबरते. कोणीही मोठ्याने बोलताना ऐकल्यावर सुद्धा ती घाबरते आणि त्यामुळे तिच्याकडून चुका होतात. पोलिस या पदाला शोभेल अशी धीट कामं करण्यापेक्षा स्टेपलरमध्ये स्टेपलर पिन टाकणे, फाईल्स लावणे, कागदपत्रे भरणे, ज्येष्ठांसाठी बाटलीत पाणी भरणे, देवाची पूजा करणे ही क्षुल्लक कामे ती पोलीस स्टेशनमध्ये एका दिवसात पार पाडते. पोलिस होण्याचा एकही गुण तिच्यात नाही. उलट, कोणताही गुन्हा घडूच नये, अशी ती देवाकडे प्रार्थना करते. खरंतर तिला पोलीस बनण्यात अजिबात रस नव्हता. पण परिस्थिती अशी होती की तिला नाईलाजास्तव पोलीस दलात भरती व्हावे लागले. “शी इज गुड फॉर नथिंग”, हेच तिला नेहमी घरात आणि पोलीस स्टेशनमध्ये बोलले जाते. त्यामुळे, मंजुला ही ती निरुपयोगी आहे असे वाटू लागले पण आत्मविश्वास गमावलेल्या मंजूच्या आयुष्यात अचानक हिरोची म्हणजेच सत्याची एन्ट्री होते. एका प्रसिद्ध राजकारण्यासाठी काम करणारा सत्या, स्वभावाने अगदी रावडी, तो बोलण्यापूर्वी त्याचे हात पाय आधी बोलतात. पण मनाने तितकाच सच्चा. राजकारणावर इतका जीव की तो बेकायदेशीर कृत्य करतोय याची त्याला कल्पनाच नसते. सत्याला त्याच्या सारखीच धाडसी पत्नी हवी आहे. त्याच्या लग्न मंडपातच, पोलिस एका वॉन्टेड गुन्हेगाराचा शोध घ्यायला पोहचतात. पोलिसांनी पूर्ण प्लॅन करून ठेवलेला असतो, प्लॅननुसार कोणत्याही कामात रस नसलेल्या मंजूला नववधूच्या रूपात उभे केले जाते आणि जोपर्यंत गुन्हेगार पकडला जात नाही तोपर्यंत तिने वधूच्या ठिकाणाहून हलायचं नाही असा कडक आदेश तिला दिला जातो. पण कट रचला जात असताना, मंजूच्या लग्नाची गाठ सत्यासोबत बांधली जाते. आता भित्री मंजू आणि निडर सत्या लग्नाच्या बंधनात सामान्य वैवाहिक आयुष्य जगतील का? दोघांचं एकमेकांसोबत जमेल का? सत्याच्या सहवासात राहून मंजूच्या स्वभावात बदल घडून ती धाडसी होईल का? आत्मविश्वास गमावलेली मंजू या नव्या नात्यामुळे स्वतंत्र होऊन स्वतःची ओळख निर्माण करेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना या मालिकेतून नक्की मिळतील.
संदीप जाधव निर्मित 'कॉन्स्टेबल मंजू' या मालिकेत मोनिका राठी हिने मंजुची आणि वैभव कदम यांनी सत्याची भूमिका साकारली आहे. या मालिकेचे संवाद तेजपाल वाघ यांनी लिहिले असून स्वप्नील गांगुर्डे यांनी कथा, पटकथा लिहिली आहे. भिन्न स्वभावाची ही अनोखी प्रेम कहाणी नक्की पाहा सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता फक्त सन मराठी वाहिनीवर.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai