Breaking News
पनवेल ः नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पनवेल येथे उभारण्यात आलेले पुरावा व्यवस्थापन कक्ष हा महाराष्ट्र नव्हे तर देशासाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 मार्च रोजी याठिकाणी व्यक्त केला. मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
गुन्ह्यातील मुद्देमाल हा पोलिस ठाण्यातील मुद्देमाल कक्षामध्ये ठेवला जात असतो; परंतु ठाण्यात पुरेशी जागा नसणे, मुद्देमाल खराब होणे, ओला होणे यासारख्या अनेक समस्यांमुळे मुद्देमाल योग्य पद्धतीने न्यायालयासमक्ष सादर करण्यात अडचणी निर्माण होतात. हा सर्व मुद्देमाल पोलिस ठाण्यातून स्वतंत्र ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ठेवल्यास जागेची, वेळेची व मनुष्यबळाची बचत होऊ शकते. या उद्देशाने नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाची संकल्पना राबविल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तर पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पोलिस खात्यातील कामाचा वाढता ताण व अपुरे मनुष्यबळ यातून मार्ग काढत नवनवीन संकल्पना राबवून परिमंडळ एक व दोन या स्तरावर या प्रकारचे उपक्रम सुरू करण्यात आले असून, यामुळे पोलिसांना फायदा होत असल्याचे सांगितले. प्रत्येक पोलिस ठाण्याकरिता स्वतंत्र रॅक व मुद्देमालासाठी स्वतंत्र क्यूआर कोड असल्याने मुद्देमाल एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्याचे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सांगितले.
यावेळी एनआरआय पोलीस ठाणे व तळोजा पोलीस ठाणे येथील पुरावा व्यवस्थापन कक्षाचेदेखील ऑनलाईन प्रणालीद्वारे उद्घाटन झाल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास आमदार गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहआयुक्त संजय येनपुरे, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी किसन जावळे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, परिमंडळ दोनचे उपायुक्त विवेक पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते. मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाचे उद्घाटन झाल्यानंतर मान्यवरांकडून या कक्षाचे कामकाज, केस पेपर रूम, रेकॉर्ड कक्षाची पाहणी केली. तसेच ई-पैरवी कक्षाचे कामकाज, सायबर सेलच्या कामकाजाची पाहणी करण्यात आली. कार्यक्रमस्थळी विविध प्रकल्पांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. यामध्ये डायल 112, आय बाईक, यथार्थ, नेल्सन सिस्टीम, जागरूक नवी मंबईकर, सायबर एफआययु, वुमन हेल्प डेस्क, ट्राफीक हेल्प डेस्क स्टॉल्सचा समावेश होता.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai