पीपीपी तत्वावर उभारणार बहुमजली वाणिज्य वाहनतळ
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 27, 2024
- 355
नफ्यातील 25 टक्के हिस्सा पालिका देणार सिडकोला
नवी मुंबई : सिडकोने बेलापूर व वाशी येथे दिलेल्या सार्वजनिक वाहनतळाच्या भूखंडावर आता सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर (पीपीपी) बहुमजली वाहनतळासोबत वाणिज्य संकुल उभारण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. महापालिकेला मिळणाऱ्या नफ्याच्या उत्पन्नातील 25 टक्के हिस्सा सिडकोला देण्याच्या अटीवर महापालिकेला भूखंडाच्या वापर बदलास तात्पुरते ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही भूखंडावर पीपीपी तत्वावर बहुमजली वाहनतळासह वाणिज्य संकुल उभारण्याचा महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
गत जानेवारी महिन्यात तत्कालीन नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी बेलापूर व वाशी येथील भूखंडावर बहुमजली वाहनतळ व वाणिज्य संकुल उभारण्यासाठी दोन्ही भूखंडाचा वापर बदल करण्याकरिता सिडकोकडे ना हरकत प्रमाणपत्र देण्याची विनंती केली होती. त्यानंतर सिडकोने सार्वजनिक वाहनतळाच्या भूखंडाचा वापर करण्यास तात्पुरते ना हरकत प्रमाणपत्र देऊन मंजुरी दिली आहे. मंजुरी देताना नवी मुंबई महापालिकेला वाहनतळ व वाणिज्य संकुलाच्या वापरातून मिळणाऱ्या नफ्यातील 25 टक्के हिस्सा सिडकोला देण्याची अट घातली आहे. तसेच भूखंड अथवा त्याचा काही भाग कोणाच्याही नावे महापालिकेला हस्तांतरीत करता येणार नसून भविष्यात वाहनतळ उभारण्यासाठी नवी मुंबई महापालिकेला अन्य स्वतंत्र भूखंड देणार नसल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.
- बेलापूर, वाशीमध्ये सात कोटींचे भूखंड
नवी मुंबई महापालिकेला सार्वजनिक वाहनतळ उभारणीसाठी सिडकोने बेलापूर सेक्टर 15 येथे तब्बल 6760 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड क्र. 72 हा राखीव किंमतीच्या 25 टक्के दराने म्हणजेच 1 कोटी 18 लाखाला ऑगस्ट 2015 मध्ये दिला आहे. तसेच वाशी सेक्टर 30 ए येथे 11,904 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड क्र. 36 ए हा राखीव किंमतीच्या 25 टक्के दराने म्हणजेच 5 कोटी 98 लाख 46 हजाराला सप्टेंबर 2018 मध्ये वितरित केला होता. मात्र, अद्याप महापालिका या दोन्ही भूखंडावर वाहनतळ उभारू शकली नाही.
सिडकोने बेलापूर व वाशी येथे दिलेल्या भूखंडावर पीपीपी तत्वावर बहुमजली वाहनतळ आणि वाणिज्य संकुल उभारण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर यै प्रकल्पाचा मार्ग मोकळा होणार आहे - संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai