विचारेच ठाण्याचे ‘नरेश?
- by Aajchi Navi Mumbai
- May 04, 2024
- 497
नवी मुंबई ः लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून ठाणे कोणाच्या पारड्यात पडेल याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. अखेर भाजप आणि शिंदेसेना यांच्या वाटाघाटीत ही जागा शिंदेंच्या वाट्याला येऊन त्यांनी नरेश म्हस्के यांचे नाव जाहीर केले. आता ठाण्यात ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना' अशी लढत होणार असल्याने मतदार ठाण्यावर कोणाला ‘राज' करायला सांगतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दूसरीकडे नरेश म्हस्के यांचे नाव जाहीर होताच ठाण्याचे ‘नरेश' विचारेच असतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. ठाणे लोकसभा मतदार संघ हा आनंद दिघे यांनी भाजपकडून खेचुन घेऊन तेथून शिवसेनेचा खासदार निवडून आणला. गेली अनेक दशके ही जागा भाजपा शिवसेनेच्या युतीतही शिवसेनेकडे राहीली होती. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना शिंदे आणि ठाकरे अशा दोन गटात विभागली गेली. राजन विचारे हे मागील दोन वेळा शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते. शिवसेनेत फुट पडली त्यावेळी त्यांनी ठाकरे यांच्यासोबत राहणे पसंत केले. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदार संघ महायुतीत कोणत्या पक्षाकडे जातो याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. भाजपने हा मतदारसंघ मुळचा आमचाच असल्याचे सांगत त्यावर दावा ठोकला होता, तर ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने तो शिवसेनेकडेच राहिला पाहिजे अशी भुमिका एकनाथ शिंदे यांनी घेऊन ठाण्यासाठी तुटेपर्यंत ताणून धरले होते. त्यामुळे अखेर भाजपने माघार घेत ही जागा शिंदेसेनेला दिली.
ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळले या आशेने माजी खासदार संजीव नाईक यांनी प्रचार सुरु केला होता. ठाकरे गटाने या अगोदरच राजन विचारे यांचे नाव जाहीर करुन विचारे यांनी प्रचाराची एक फेरी पुर्ण केली. मंगळवारी झालेल्या वाटाघाटीत ही जागा शिंदेसेनेकडे आल्यावर त्यांनी नरेश म्हस्के यांचे नाव जाहीर केल्यानंतर ठाकरे गटाने मोठा जल्लोष केला. मात्र नरेश म्हस्के यांना उमेदवारी मिळताच भाजपात नाराजीनाट्य उफाळून आले. संजीव नाईक यांना उमेदवारी न दिल्याने नवी मुंबई, मिरा-भाईंदर येथे याचे पडसाद उमटले असून त्याचा फायदा राजन विचारे यांना होण्याची शक्यता आहे. मुळात ही लढत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी असल्याने आणि दोन्ही उमेदवार ठाण्यातील असल्याने तेथील शिवसेनेची मते विभागली गेल्याने त्याचा फायदा विचारे यांना होणार असे बोलले जाते. नवी मुंबईतून नाईक समर्थक कितपत म्हस्के यांना साथ देतील याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यातच बेलापुरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया जरी दिली असली तरी राजन विचारे यांनी गेल्या 10 वर्षात नवी मुंबईत चांगलाच जम बसवला असल्याने नवी मुंबईतून त्यांना मोठे मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे. नवी मुंबईत म्हस्के यांची पुर्ण मदार शिंदेसेनेचे विजय चौगुले, विजय नाहटा आणि आ.मंदा म्हात्रे यांच्यावर असून नवी मुंबईकर म्हस्के यांना कितपत स्विकारतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या पार्श्वभुमीवर राजन विचारेच ठाण्याचे नरेश ठरणार अशी चर्चा जरी राजकीय वर्तुळात रंगली असली तरी त्यासाठी 4 जुनची वाट पाहावी लागणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai