Breaking News
पनवेल : पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदाची सुत्रे मंगेश चितळे यांनी हाती घेतल्यानंतर कामाच्या नियोजनाच्या बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. यामध्ये पावसाळ्यापूर्वी कामाचा आढावा, महावितरण, आयआरबी, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा विविध प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांसोबत, तसेच भविष्यातील विकासाची घडी बसविण्यासाठी महापालिका प्रशासनाने हाती घेतलेल्या प्रकल्पांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. शहरातील पाण्याचा आणि इतर पायाभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लावण्यासोबत सुरु असलेली विकासकामे वेगाने कशी करता येतील असे आव्हान आयुक्त चितळे यांच्यासमोर आहे.
शनिवार हा सुट्टीचा दिवस असला तरी आयुक्त चितळे यांनी पालिका उपायुक्त आणि अभियंत्यांसोबत पावसाळ्यापूर्वी सुरु असलेल्या नालेसफाईची पाहणी दौरा केला. स्थानिक अधिकाऱ्यांना न सांगता हा दौरा अचानक पालिका क्षेत्रातील चारही प्रभागांमध्ये घेण्यात आला. तसेच अतिवृष्टीत आपत्ती ओढावू नये यासाठी पावसाळ्या पूर्वी केलेल्या कामांच्या आणि आपत्ती व्यवस्थापनाचा आढाव्यासाठी पालिकेचा पदभार घेतलेल्या दिवशीच बैठक बोलावण्यात आली. या बैठकीमध्ये पालिका क्षेत्रात रायगड जिल्हापरिषदेच्या शाळांच्या 29 शाळा अतिधोकादायक तर 27 शाळा तातडीने दुरूस्ती करणे आवश्यक असल्याने शाळा सुरू होण्यापूर्वी अतिधोकादायक शाळेच्या इमारतीचे पाडकाम करुन इमारतीची दुरुस्ती सुचविलेल्या शाळांची किरकोळ दुरूस्ती तातडीने करण्याची सूचना पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांना आयुक्तांनी दिली.
जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील ओ.एन.जी.सी. पुलाखाली पाणी साचण्याची दरवर्षांची समस्या आहे. तेथे पाणी निचरा होण्यासाठी पालिकेने व इतर प्रशासकीय विभागांसोबत समन्वय साधून उपाययोजना करण्याचे आदेश आयुक्त चितळे यांनी दिले. याच मार्गिकेवर वेलकम हॉटेल येथे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबुंन राहत असल्याने एम.एस.आर.डी.सी. ला सुद्धा लेखीपत्र देऊन कळविण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. दुसऱ्या दिवशी आपत्ती व्यवस्थापनाच्या आढावा बैठकीत पालिका हद्दीतील 79 धोकादायक इमारती असून यापैकी 40 इमारती रिक्त करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून आयुक्तांना देण्यात आली. सध्या यापैकी 2 इमारतींवर पालिकेच्यावतीने पाडकाम सुरु असून उर्वरित इमारतींमधील पाणी व वीज पुरवठा बंद करून लवकरात लवकर या इमारती रिकाम्या करून त्यांच्यावरती कारवाई करण्याचे पालिकेचे नियोजन असल्याची माहिती या बैठकीत अधिकाऱ्यांनी आयुक्तांना दिली. तसेच शहरामध्ये 33 अनधिकृत फलक असून यापैकी 21 अनधिकृत फलकांवर पालिकेने कारवाई केली आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी उर्वरीत 12 फलकांचे तातडीने सर्वेक्षण करुन अत्यंत धोकादायक फलक पाडावेत अशा सूचना आयुक्त चितळे यांनी दिल्या.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai