Breaking News
पोलाद बाजार समितीतील प्रकार; एकावर गुन्हा दाखल
नवी मुंबई : कळंबोली येथील पोलाद बाजार समितीची 54 कोटी 28 लाखांच्या मुदतठेव रक्कमेचा अपहार तोतया बँक अधिकाऱ्याने केल्याची घटना उघडकीस आली आहे. ठेवीची रक्कम समितीच्या बँक खात्यात जमा करण्याऐवजी वेगळ्या खात्यामध्ये जमा करून हि फसवणूक झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकार घडत असून आता हा गैरव्यवहार उजेडात आला. या फसवणूक प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली असता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञात व्यक्तीने स्वतःला बँक अधिकारी भासवून तब्बल तीन वर्षात बाजार समितीचे 54 कोटी 28 लाख हडपले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी निकम यांच्यामार्फत समितीच्या बँक खात्यांची व त्यामधील ठेवींची पडताळणी सुरु असताना हा प्रकार उघड झाला आहे. बाजार समितीचे युको बँकेत खाते असून सुमन शर्मा नावाची व्यक्ती 2022 पासून स्वतःला बँकेचा शाखा अधिकारी सांगून समितीच्या कार्यालयात येऊन ठेवीचे धनादेश घेऊन जात होता.त्याच्याकडून घेतलेल्या धनादेशाची बनावट पावती देखील दिली जात होती. या पावतीवर विश्वास ठेवीची रक्कम समितीच्याच खात्यात जमा होत असल्याचा समज अधिकाऱ्यांचा झाला होता. दरम्यान निकम यांना त्याच्यावर संशय आल्याने त्यांनी शर्माकडे बँकेतल्या आजवरच्या ठेवींबद्दल चौकशी देखील केली. मात्र त्याच्याकडून केवळ तोंडी माहिती दिली जात होती. तसेच ठेवी काढल्यास तुम्हाला दंड भरावा लागले असे सांगून त्यांचे ठेवींकडून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यामुळे अधिकच संशय बळावला असता युको बँकेत चौकशी केली असता सुमन शर्मा नावाचे कोणीही नसल्याचे उघड झाले. तर 2022 पासून त्याने नेलेले धनादेश तपासले असता तब्बल 54 कोटी 28 लाखांच्या ठेवी बाजार समितीच्या खात्याऐवजी वेगळ्याच खात्यात जमा झाल्या असल्याचेही उघड झाले. त्यानुसार निकम यांच्या तक्रारीवरून सुमन शर्मा नावाच्या व्यक्तीवर कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष दोन मार्फत अधिक तपास केला जात आहे.
निष्काळजीपणा की सहभाग?
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai