Breaking News
पदवी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर
मुंबई : विविध महाविद्यालयांनी अलीकडच्या काळात नवनवीन स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रम सुरू केले असून विद्यार्थ्यांचा कल हा पारंपारिक अभ्यासक्रमांव्यतिरिक्त स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांकडे वाढत असल्याचे दिसत आहे. याचा परिणाम पदवी प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीवर झाल्याचे दिसून आले. यंदा स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये (कट ऑफ) वाढ आणि पारंपारिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये किंचितशी घट झालेली आहे.
यंदा प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी मुंबई विद्यापीठाची 2 लाख 50 हजार 453 विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी केली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अर्जांमध्ये ‘बी.कॉम.' अभ्यासक्रमासाठी सर्वाधिक 1 लाख 88 हजार 390 अर्ज सादर झाले, तर याव्यतिरिक्त स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांसाठीही सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले.
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये पदवीच्या 3 आणि 4 वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी गुरूवार, 13 जून रोजी जाहीर करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी त्यांच्या स्तरावर संकेतस्थळावरून जाहीर केली. मुंबई विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पहिल्या गुणवत्ता यादीअंतर्गत संबंधित महाविद्यालयात जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी आणि शुल्क भरून प्रवेश निश्चिती (हमीपत्र अर्जासह) 14 जून ते 20 जून रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत होणार आहे.
यंदा माटुंग्यातील पोद्दार महाविद्यालयात पहिल्या गुणवत्ता यादीनुसार गतवर्षीच्या तुलनेत ‘बी.कॉम.' अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये साधारण दीड टक्क्यांनी घट झालेली आहे. यंदा ‘बी.कॉम.' अभ्यासक्रमासाठी 94.00 टक्के इतके प्रवेश पात्रता गुण असतील. गतवर्षी ‘बी.कॉम.' अभ्यासक्रमासाठी पोद्दार महाविद्यालयात 95.50 टक्के इतके प्रवेश पात्रता गुण होते. या शिवाय यंदा बी.कॉम फायनान्शिअल मार्केट्ससाठी 93.83 टक्के (गतवर्षी 93.08 टक्के), बी.एस्स्सी. डाटा सायन्स अँड अनॅलिटीक्ससाठी 86.05 टक्के (गतवर्षी 85.83 टक्के) इतके प्रवेश पात्रता गुण आहेत. तसेच, फोर्ट येथील सेंट झेविअर्स महाविद्यालयात पहिल्या गुणवत्ता यादीनुसार बी.ए. अभ्यासक्रमासाठी 92.33 टक्के, बी.ए. मानसशास्त्र 91.83 टक्के, बी. कॉम. (अकाऊंट ॲण्ड फायनान्स) 91.67 टक्के आणि बी.एस्सी. अभ्यासक्रमासाठी 65 टक्के इतके प्रवेश पात्रता गुण आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai