Breaking News
दोषींवर कारवाई करण्याची नरेंद्र पाटील यांची मागणी
नवी मुंबई : अण्णासाहेब पाटील महामंडळातील 61 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याने व्याजपरताव्यासह नवीन प्रस्ताव मार्गी लावण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. महामंडळाचे कामकाज ठप्प करण्याचा व एक लाख उद्योजक घडविण्याचा संकल्प पूर्ण होऊ न देण्याचे षङयंत्र सुरू आहे. लोकसभेला समाजाच्या नाराजीचा सरकारला फटका बसला असून, कर्मचारी कपातीमुळे विधानसभेलाही तो बसण्याची शक्यता व्यक्त करून महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते यांनी शुक्रवारी तडकाफडकी राज्याच्या विविध जिल्ह्यांतील 61 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. याबाबत सोमवारी पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला. शासनाला राज्यातील मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री समाजाचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देत असताना दुसरीकडे अचानक महामंडळातील कर्मचारी कामावरून काढून टाकले. अध्यक्ष असूनदेखील मलाही याची पूर्वकल्पना दिली नसल्याबद्दल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. महामंडळाने आतापर्यंत 92 हजार 495 मराठा तरुणांना विविध बँकांच्या माध्यमातून 7201 कोटी रुपये कर्ज उपलब्ध करून दिले आहे. यासाठी आतापर्यंत 780 कोटी रुपये व्याजपरतावा महामंडळाने दिला आहे. लवकरच एक लाख उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट पूर्ण करायचे होते. परंतु, व्यवस्थापकीय संचालकांनी अचानक कर्मचारी कपात करून या मोहिमेला खीळ घातली आहे. निवडणूक आचारसंहितेच्या काळात 50 ते 60 कोटी व्याजपरतावा देण्याचे काम शिल्लक आहे. नवीन प्रस्तावांची छाननी करणेही आवश्यक आहे. ही सर्व कामे आता ठप्प होणार आहेत. महामंडळ निष्क्रिय करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप जुने कर्मचारी व प्रशासनावर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यवस्थापकीय संचालकांची तत्काळ बदली करून प्रकरणी दोषींवर कारवाई केली नाही तर राज्यभर असंतोष निर्माण होईल व विधानसभा निवडणुकीमध्ये याचा फटका बसेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
विभागनिहाय कर्मचारी कपातीचा तपशील
मुख्यालय - 10 बीड- 2 पुणे- 3 सांगली- 3 लातूर- 1 नाशिक- 2परभणी- 2 धुळे- 1 मुंबई- 2 जळगाव- 1 धाराशिव- 3 रायगड- 1 छत्रपती संभाजीनगर - 2 सिंधुदुर्ग- 3 ठाणे- 2 अहमदनगर - 4 कोल्हापूर- 1 नांदेड- 2 एडीजीएम ऑफिस - 1 नवी मुंबई - 3 रत्नागिरी- 1 जळगाव- 2नागपूर- 2 सातारा- 1 सोलापूर- 1
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai