Breaking News
नऊ महिन्यांनंतरही काम कागदावरच
नवी मुंबई ः तुर्भे रेल्वे स्थानकाजवळ ठाणे-बेलापुर रस्ता ओलांडताना होणारी वाहतुक कोंडी आणि अपघात होऊन अनेकांनी गमावलेला जीव यामुळे महापालिकेने येथे नागरिकांसाठी उड्डाणपुल बनविण्याचे काम प्रस्तावित केले आहे. परंतु 9 महिने उलटून गेल्यावरही उड्डाणपुल कागदावरच राहिल्याने स्थानिकांना वाहतुक कोंडीबरोबर ध्वनी व वायु प्रदुषणाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पालिकेचा हा कारभार म्हणेज आजारापेक्षा उपचार भयंकर असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी दिली.
तुर्भे स्टोअर येथील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी आणि रस्ता ओलांडतांना होणारे अपघात टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेने तुर्भे रेल्वे स्थानकासमोर उड्डाणपुल बांधण्याचे काम हाती घेतले होते. या कामाची निविदा प्रक्रिया पुर्ण होऊन 25 एप्रिल 2022 रोजी ठेकेदार मे. महावीर रोड्स ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. यांना कार्यादेश देण्यात आला होता. या कामाचा खर्च 30 कोटी रुपये असून ते पुर्ण करण्याची तारीख 25 ऑक्टोबर 2023 होती. उड्डाणपुलाच्या आराखन्यात महत्वाचे बदल स्थानिक नेत्यांनी सूचवल्याने काम सुरु करण्यास उशिर झाल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात येत आहे.
ठेकेदाराने काम सुरु करुन जवळजवळ वर्ष होत आहे तरी खोदकामाव्यतिरिक्त इतर कोणतेही काम ठेकेदाराकडून करण्यात आले नसून गेली 9 महिने वाहतुकदार व प्रवाशी भयंकर वाहतुक कोंडीचा सामना करत आहेत. या वाहतुक कोंडीमुळे तुर्भे स्टोअर लगतच्या भागात ध्वनी प्रदुषण आणि वायु प्रदुषण वाढल्याने त्याचा नाहक फटका स्थानिकांना बसत आहे. सकाळी आणि संध्याकाळी चाकरमान्यांचा वेळ आणि इंधन वाया जात आहे. पालिकेच्या या गलथान कारभाराचा ताण वाहतुक पोलीस यंत्रणेवरही पडला असून वाहतुकीचे नियोजन करण्यात महत्वाचा वेळ वाया जात आहे. गेले 9 महिने हे काम बंद असून याबाबत पालिकेने कोणत्याही प्रकारच्या सूचना नागरिकांना व पोलीस प्रशासनाला दिल्या नसल्याने काम कधी सुरु होणार याबाबत सर्वच अनभिज्ञ आहेत. याप्रकरणी शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्याशी संपर्क साधला असता उड्डाणपुलाच्या सुधारित डिझाईनचे काम सुरु असल्याने कामाला उशीर होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस