Breaking News
मालमत्ता कर भरण्यास उत्तम प्रतिसाद
पनवेल : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पनवेल महापालिकेच्या वतीने मालमत्ता कराच्या सुधारित देयकांचे वाटप करण्यात आलेले आहे. आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार नागरिकांना बिले भरणे सोयीचे व्हावे यासाठी नागरिकांच्या सोयीसाठी खारघर मधील 36 सोसायटीमध्ये 22 जून 2024 पासून विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांचा लाभ घेऊन तात्काळ कर भरणा करावा, असे आवाहन महापालिका तर्फे करण्यात आले आहे. या आवाहनाला मालमत्ता धारकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मालमत्ता कर भरण्यासाठी 30 जूनपर्यंत शनिवार, रविवारी देखील महापालिका मुख्यालय आणि प्रभाग कार्यालय सुरु असणार आहेत.
कर निर्धारण वर्ष 2021-22 पासून मालमत्ता कराच्या सर्व थकीत रवकमेचा भरणा 2 महिन्यांच्या आत करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. सदर आवाहनाला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून 18 जून पासून रोज सुमारे 4 कोटींचा भरणा महापालिकेच्या तिजोरीत होत आहे. 29 एप्रिल ते 22 जून 2024 या कालावधीत पनवेल महापालिकेच्या तिजोरीत 92.62 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. तर विशेष शिबीराच्या माध्यमातून खारघर विभागात 2.67 कोटींची कर वसुली झाली आहे. दरम्यान, 22, 23 आणि 24 जून रोजी खारघर मधील निसर्ग ग्रुप हाईड पार्क, जलवायू डिफेन्स, खाघर सेलिब्रेशन वे एच-4, रघुनाथ विहार आर्मी, स्पॅगेटी, केसर गार्डन या सोसायट्यांमध्ये तर 25 जून रोजी महालक्ष्मी, मातृछाया, वास्तुविहार, प्रियदर्शनी, हेक्स ब्लॉक्स, जलवायु विहार डिफेन्स या सोसायट्यांमध्ये शिबीर पार पडले.
ज्या मालमत्ताधारकांना अद्यापही सुधारित मालमत्ता कर देयक प्राप्त झालेले नाही, त्यांनी ऑनलाइन पोर्टल (संकेतस्थळ) किंवा महापालिका कार्यालयास भेट देऊन सुधारित देयक उपलब्ध करुन घ्यावे. महापालिकने मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेच वेबसाईटवर जाऊनही मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे. याचा लाभ मालमत्ताधारकांनी घ्यावा. मालमत्ताधारकांना काही शंका असल्यास 1800-5320-340 या टोल फ्री क्रमांवर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका तर्फे करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सुधारीत देयके पुन्हा तयार करावी लागल्याने सन 2024-25च्या चालू कर मागणीवर 31 मे अखेर देण्यात आलेली 5 टक्के इतकी सूट 30 जून 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सदर सुविधेचा लाभ घ्यावा. याशिवाय मालमत्ता कराचा भरणा ऑनलाईन केल्यास एकूण 2 टक्के इतकी सुट दिली जात असल्याने नागरिकांनी त्वरित कर भरणा करुन महापालिकेला सहकार्य करावे. तसेच पनवेल शहराच्या सर्वांगीण विकासास हातभार लावावा. -मंगेश चितळे, आयुवत-पनवेल महापालिका.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai