लाडक्या बहिणींची लगबग
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 06, 2024
- 480
महिन्याला मिळणार 1500 रु.
मुंबई ः पावसाळी अधिवेशामध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महिलावर्गासाठी विविध योजना राज्य शासनाने जाहीर केल्या आहेत. त्यातली मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला 18 हजार रुपये राज्य सरकार देणार आहे. यासाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना जाहीर होताच महिलावर्गाची सदर योजनेसाठी लागणारी कागदपत्रे जमा करण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. तहसील कार्यालय, सेतु केंद्र, अंगणवाडी मध्ये लाभार्थ्यांची गर्दी होऊ लागली आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना मिळावा यासाठी सरकारने योजनेच्या पात्रता निकषांमध्येही सुधारणा केल्या आहेत. त्याचबरोबर काही अटी शिथिल केल्या आहेत. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, फॉर्म भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्सनास आल्यास अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, या योजनेचे संनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
पात्रतेचे निकष
- लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
- राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
- कमीत कमी 21 वर्ष ते जास्तीत जास्त 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत अर्ज करता येणार.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
कोण अपात्र?
- ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
- ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
- ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले अथवा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
- सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 रुपये जास्त लाभ घेतला असेल.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.
- ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.
लागणारी कागदपत्रे
- योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज
- लाभार्थी महिलेचे आधार कार्ड
- महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील जन्म दाखला.
- सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला.
- बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत.
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- शिधा पत्रिका (रेशन कार्ड)
- योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र.
योजनेचा अर्ज कसा भरायचा?
- योजनेसाठी अर्ज पोर्टल, मोबाईल ॲप, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज करता येईल.
- पात्र असलेली महिला ऑनलाईन अर्ज करू शकते. पण, ज्या महिलेला ऑनलाईन अर्ज करता येत नाही, त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी, ग्रामीण, आदिवासी), ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असतील.
- भरलेला अर्ज अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, सेतू सुविधा केंद्रात नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन पद्धतीने दाखल करण्यात येईल. अर्ज दाखल केल्यानंतर पोच पावती दिली जाईल.
- अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई केवायसी करता येईल. त्यासाठी महिलेने कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे शिधा पत्रिका (रेशन कार्ड) आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे.
रहिवाशी प्रमाणपत्र नसेल तर
- 15 वर्ष जुने रेशन कार्ड
- मतदार ओळखपत्र
- शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
- जन्म दाखला
- या चारपैकी कोणतेही एक ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.
- माझी लाडकी बहीण योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आता या योजनेतील लाभार्थी महिलांची वयोमर्यादा आधी 21 ते 60 वर्ष होती. ती नंतर 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आली आहे.
- इतर राज्यातील महिलांही करू शकता अर्ज
परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्राचा रहिवाशी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.
- उत्पन्नाचा दाखला नसेल तर
या योजनेसाठी अडीच लाखांच्या उत्पन्नाची अट आहे. मात्र, उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल, तर ज्यांच्या पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे, त्यांना उत्पन्न दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात आली आहे. ते रेशन कार्ड जोडून अर्ज भरतात. योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai