Breaking News
पनवेल : दोन दिवस पडलेल्या पावसाने पनवलेसह सिडको वसाहतीमध्ये पाणी भरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. काही गावात पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणत आर्थिक नुकसान झाले. याबाबत महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी पालिकेच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांशी मुख्यालयात बैठक घेऊन चर्चा केली. पुढील आठवडाभरात पालिकेच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना कळंबोलीतील पाणी निचरा न होण्यामागील कारणे, त्यावरील उपाय आणि प्रत्यक्ष पाणी अहवालानंतर कायम स्वरुपी पाणी निचरा होण्यासाठी पालिका आपत्ती व्यवस्थापन आराखडा बनविण्याचे निर्देश दिल्याचे सूत्रांकडून समजते.
मंगळवारच्या पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, स्वच्छता विभागातील विभागप्रमुख, प्रभाग अधिकारी यांच्यासह विविध अधिकारी बैठकीत उपस्थित होते. बैठकीत वसाहतीमध्ये नालेसफाई पावसाळ्यापूर्वी झाल्याचा दाव्यासोबत कमी वेळेत जास्त पाऊस पडल्याने आणि तळोजा औद्योगिक वसाहतीमधून वाहणाऱ्या कासाडी नदीपात्रामध्ये आणि पात्राच्या शेजारी अवैध मातीचे भराव टाकल्यामुळे ते पाणी कळंबोलीत शिरल्याचे सांगण्यात आले. तसेच फुडलॅण्ड कंपनीमागील कासाडी नदीपात्रात पाणी जाण्याच्या वाटेवर भराव केल्यामुळे पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग बंद झाल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी बैठकीत छायाचित्रासह दाखवून दिले. या बैठकीत कासाडी नदीपात्रालगत भराव, मुंब्रा पनवेल महामार्गाला रोडपाली येथील एमएसआरडीसीच्या जागेवरील मातीचा भराव, तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये काही कारखानदारांनी केलेल्या मातीच्या भरावामुळे गाव आणि कारखाने यांच्यातील अंतर कमी झाल्याने पाणी साचण्याची जागा कमी झाल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी उपायुक्त कैलास गावडे यांना एमएसआरडीसी प्रशासन, सिडको मंडळ यांना लेखी पत्र देऊन त्यांच्या जागेवरील अवैध मातीचे भराव काढून घेऊन पावसाळी पाणी जाणारे नैसर्गिक वाट करुन देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच ज्या नैसर्गिक वाटेने कासाडी नदीचे पाणी कळंबोली वसाहतीमध्ये शिरते तेथे फायबरचे स्वयंचलित गेट महापालिका प्रशासन तेथे बसविल्यास हा प्रश्न सुटेल का याविषयी तपासणी करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिल्या आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai