विजयाचे अर्धेदान नाईकांच्या झोळीत

प्रभाग आरक्षण भाजपा पथ्यावर

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी 1 फेबु्रवारीला वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडलेल्या आरक्षण सोडतीत अनेक दिग्गज नगरसेवकांना फटका बसला आहे. यात विरोधकांच्या हमखास निवडून येणार्‍या 12 जागांना हा थेट फटका बसल्याने भाजपाला मोठा लाभ  होणार असून ही आरक्षण सोडत गणेश नाईकांच्या पदरात विजयाचे अर्धेदान निवडणुकीपूर्वीच टाकून गेल्याचे राजकिय समिक्षकांचे मत आहे.

नवी मुंबईतील राजकारणात नावलौकिक मिळवलेल्या गणेश नाईक यांना याही वेळी नियतीने आरक्षणाच्या माध्यमातून हात दिला आहे. दर वेळी आरक्षणाबाबत नाईकांवर सत्तेच्या गैरवापराचा आरोप करणारे विरोधक मात्र या वेळी आरक्षणाचे दान निमूटपणे त्यांच्या पदरी पाडून कामाला लागलेले दिसत आहेत. ऐरोली मतदारसंघातून गेल्या वेळी पालिका निवडणुकीत आघाडी मिळवणार्‍या शिवसेनेला या आरक्षण सोडतीत मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे दिग्गज नेते विजय चौगुले, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, एम.के. मढवी, घणसोलीतील प्रशांत पाटील, किशोर पाटकर यांच्या प्रभागांना आरक्षणाचा फटका बसल्याने ते स्पर्धेतून बाद झाले आहेत किंवा त्यांना दुसर्‍या प्रभागातून आपले नशीब आजमावावे लागणार आहे. त्यामुळे तेथील नाराजीचा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. त्यातच काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या दशरथ भगत यांचे प्रभाग तसेच राहिल्याने नाईकांचे पाठबळ आयतेच वाढणार आहे. भाजपातील अनंत सुतार, सुधाकर सोनावणे, रवींद्र इथापे तसेच विद्यमान महापौर जयवंत सुतार यांचे प्रभाग राखीव झाल्याने या प्रभागातून ताजा दमाच्या उमेदवारांना संधी देण्याची गणेश नाईकांची इच्छा फलद्रुप होणार आहे. 

आतापर्यंत गेल्या काही महिन्यांतील नाईकांचे राजकीय अंदाज चुकले असल्याची चर्चा नवी मुंबईत असली तरी पालिका निवडणुकीत त्यांना प्रभाग आरक्षणामुळे सत्ता मिळवण्याची पुन्हा एकदा संधी असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, नशिबाने जरी अर्धेदान निवडणुकीपूर्वी नाईकांच्या झोळीत टाकले असले तरी त्यांच्या गोटातील किती नगरसेवक शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहतात, यावरच पालिकेतील विजयाचे गणित अवलंबून असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

चौकट

जातीच्या प्रमाणपत्रासाठी इच्छुकांची धावपळ

निवडणुकीची आरक्षण सोडतीत अनेक दिग्गज उमेदवारांचे प्रभाग आरक्षित झाले आहेत. आरक्षित प्रभागांमध्ये अनुसूचित जातीसाठी 10, अनुसूचित जमातींसाठी दोन, नागरिकांची मागास प्रवर्गासाठी 30 तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी  69 प्रभाग अशी स्थिती आहे. यामध्ये अनेक दिग्गज नगरसेवकांचे प्रभाग हे ओबीसी, नागरिकांचा मागासप्रवर्ग, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत, त्यामुळे अनेक इच्छुक जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कामाला लागल्याची चर्चा सध्या नवी मुंबईत असून त्यातून गैरकारभार होण्याची शक्यता आहे.